Type Here to Get Search Results !

खत-बियाणे विक्रेत्यांचा संप पेटला:साताऱ्यात 2500 दुकाने ठप्प, खरीप तयारीला फटका

राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी (खत, बियाणे व कीटकनाशक विक्रेते) आजपासून बेमुदत संप पुकारल्याने सातारा जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार कृषी सेवा केंद्रे बंद राहण्याची शक्यता असून, खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना खते व बियाणे उपलब्ध होणार नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. या संपामागील प्रमुख कारण म्हणजे कंपन्यांकडून राबवली जाणारी ‘लिंकिंग’ पद्धत होय. रासायनिक खतांसोबत इतर अनावश्यक उत्पादने जबरदस्तीने घ्यावी लागतात, असा विक्रेत्यांचा आरोप आहे. यामुळे विक्री न होणाऱ्या उत्पादनांचा साठा वाढून आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची तक्रार विक्रेत्यांनी केली आहे. तसेच ‘साथी’ पोर्टलचा सक्तीचा वापर केवळ कंपन्यांपुरता मर्यादित ठेवावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय खतांचा पुरवठा ‘FOR’ पद्धतीने करावा व विक्रेत्यांना मिळणारे मार्जिन वाढवावे, अशी मागणीही संघटनांकडून करण्यात आली आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर संपाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या बंदमुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे 70 ते 80 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. खरीप हंगामासाठी शेतकरी तयारीला लागले असताना आवश्यक कृषी निविष्ठा मिळत नसल्याने पेरणीच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून विक्रेत्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अन्यथा शेतकरी आणि कृषी व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/E0PybZd

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.