राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन झालं आहे. भारती पवार यांनी आज पुण्यात वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले असून उद्या मंगळवारी दुपारी 12 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. भारती पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. भारती पवार कोण होत्या? भारती पवार या गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होत्या. त्या पूर्वाश्रमीच्या भारती श्रीपतराव पाटील. मूळच्या मुंबईतील असलेल्या भारती यांचे बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांचे शालेय शिक्षण तेथील बालमोहन विद्या मंदिरात झाले. रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. चित्रकलेत त्यांचा हातखंडा असल्यामुळे पुढे त्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर 22 ऑगस्ट 1970 रोजी त्यांचा प्रतापराव पवार यांच्याशी विवाह झाला. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुण्यात आल्यावर 'सकाळ'च्या माध्यमातून त्या अनेक उपक्रमांत सहभागी होत. औंधजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या सुमारे 35 वर्षे सक्रिय होत्या. सुप्रिया सुळेंची फेसबुक पोस्ट अतिशय दुःखी अंतःकरणाने कळविते की, माझ्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. याक्षणी काकींच्या असंख्य आठवणींनी मनात घर केले आहे. त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. त्यांनी आम्हा सर्व भावंडांवर सदैव खुप प्रेम केले. आम्हा सर्व भावंडांना त्यांनी दिलेली प्रेमळ साथ सदैव लक्षात राहील. काकी, भावपूर्ण श्रद्धांजली, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी लिहिली आहे. तर, खासदार सुनेत्रा पवार यांनीही शोक व्यक्त केला आहे. भारती काकी आमच्यात राहिल्या नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्या आम्हा सर्वांना आईसमान होत्या. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून हृदय दुःखाने पिळवटून गेले आहे. त्यांनी सर्व पवार कुटुंबावर निस्वार्थ प्रेम केले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटलय. सुनेत्रा पवार हळहळल्या "भारती काकी आमच्यात राहिल्या नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्या आम्हा सर्वांना आईसमान होत्या. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून हृदय दुःखाने पिळवटून गेले आहे. त्यांनी सर्व पवार कुटुंबावर निस्वार्थ प्रेम केले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली..!", अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. रोहित पवारांकडून श्रद्धांजली अत्यंत दुःखद अंतःकरणाने कळवतो की, माझ्या आजी सौ. भारती प्रतापराव पवार या आमच्या कुटुंबाला सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. हा प्रसंग आमच्या संपूर्ण पवार परिवारासाठी अत्यंत कठीण आहे. आजींचा सहवास आणि त्यांचं प्रेम आम्हा सर्वांच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो! भावपूर्ण श्रद्धांजली! युगेंद्र पवार यांच्याकडून श्रद्धांजली शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनीदेखील एक्सवर पोस्ट शेअर करत भारती पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. "माझ्या आजी सौ भारती प्रतापराव पवार यांचे निधन झाले. ही आम्हा कुटुंबीयांसाठी अतिशय दुःखद आणि वेदनादायी घटना आहे. भारतीआजी म्हणजे आम्हा सर्व नातवंडांसाठी खास होत्या. त्यांच्या निधनामुळे डोक्यावरील मायेचे एक छत्र हरपल्याची भावना आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली", असं युगेंद्र पवार म्हणाले आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/hYr90gb
भारती पवार यांचे निधन:पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर, काकीच्या आठवणीने हळहळल्या सुनेत्रा पवार
March 17, 2025
0