Type Here to Get Search Results !

मुंढवा जमीन घोटाळा:पार्थ पवारांना क्लीन चिट नाही, दोन अधिकाऱ्यांच्या बडतर्फीची शिफारस; खारगे समितीचा अहवाल सादर

पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन खरेदी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विकास खारगे समितीचा तब्बल ४ हजार ३९२ पानांचा सविस्तर अहवाल अखेर विधिमंडळात सादर करण्यात आला आहे. या अहवालाने महसूल आणि नोंदणी विभागात मोठी खळबळ उडवून दिली असून, अनेक बड्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या अहवालात कोणालाही स्पष्टपणे 'क्लीन चिट' देण्यात आलेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावाचा थेट उल्लेख नसला, तरी भविष्यातील पोलीस तपासात त्यांच्यावरील कारवाईची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांच्यावर 'टांगती तलवार' कायम असल्याचे मानले जात आहे. खारगे समितीने या घोटाळ्याचा सखोल अभ्यास करून जबाबदार अधिकाऱ्यांच्या बडतर्फीची शिफारस केली आहे. यामध्ये रवींद्र तारु (सहायक दुय्यम निबंधक) आणि सूर्यकांत येवले (तहसीलदार) यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. शीतल तेजवानी आणि अशोक गायकवाड यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पार्थ पवार यांचे मावस भाऊ दिग्विजय पाटील यांना 'अमेडिया कंपनी' प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. अहवालातील निष्कर्ष काय? खारगे समितीने एकूण ७ बैठका घेऊन आणि तीन वेळा मुदतवाढ घेऊन हा सविस्तर अहवाल तयार केला आहे. अहवालातील काही धक्कादायक निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत. पार्थ पवारांबाबत सस्पेन्स कायम राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या पार्थ पवार यांच्या भूमिकेबाबत समितीने सावध पवित्रा घेतला आहे. अहवालात त्यांच्या नावाचा थेट कारवाईसाठी उल्लेख नाही. मात्र, "भविष्यातील फौजदारी तपासात जर अधिक लोकांचा सहभाग किंवा पुरावे आढळले, तर त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते," असे समितीने नमूद केल्याने हा विषय अद्याप संपलेला नाही, हे स्पष्ट होते. फौजदारी चौकशीतून नवे खुलासे होणार? समितीचे कार्यक्षेत्र केवळ प्रशासकीय अनियमिततेपुरते मर्यादित होते, त्यामुळे त्यांनी फौजदारी स्वरूपाचा सखोल तपास केलेला नाही. मात्र, आता हा अहवाल पटलावर आल्यानंतर पोलीस तपासाला गती मिळणार असून, येत्या काळात महसूल विभागातील आणखी काही 'बड्या माशांचे' नाव या घोटाळ्यात समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/B3n6UCD

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.