Type Here to Get Search Results !

अमरावती जिल्ह्यात 10 नगरपालिका, 2 नगरपंचायतींसाठी मतदान:2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल; 10 नोव्हेंबरपासून नामांकन प्रक्रिया

अमरावती जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि २ नगरपंचायतींच्या बहुप्रतीक्षित निवडणुका अखेर मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी घोषित झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाईल. मनपा आणि ग्रामीण भाग वगळता जिल्ह्यातील शहरी भागांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून संबंधित तहसील कार्यालयांमध्ये सुरू होईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर आहे. त्यानंतर, १८ नोव्हेंबर रोजी प्राप्त सर्व अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख अपील नसल्यास २१ नोव्हेंबर, तर अपील असल्यास २५ नोव्हेंबर असेल. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना चिन्हे वाटप केले जातील. त्यानंतर, उमेदवारांना प्रचारासाठी एक आठवड्याचा कालावधी मिळेल. २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. जिल्ह्यात अचलपूर 'अ' वर्ग, तर वरुड, दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी या 'ब' वर्ग नगरपालिका आहेत. याशिवाय, मोर्शी, शेंदुरजनाघाट, चांदूर बाजार, चिखलदरा, धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे या 'क' वर्ग नगरपालिकांचा समावेश आहे. या सर्व नगरपालिकांसाठी एकूण २८२ नगरसेवक आणि १० नगराध्यक्षांची निवड केली जाईल. याव्यतिरिक्त, धारणी आणि नांदगाव खंडेश्वर या दोन नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी १७ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष, असे एकूण ३६ लोकप्रतिनिधी निवडले जातील. अशाप्रकारे, एकूण ३१६ नगरसेवक आणि १२ नगराध्यक्ष मिळून ३२८ लोकप्रतिनिधींसाठी जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ८६८ मतदार मतदान करतील. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे मंत्री, खासदार, आमदार यांना मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या घोषणा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व १० नगरपालिकांचा कार्यकाळ सुमारे अडीच वर्षांपूर्वीच संपला होता. या दीर्घकाळामुळे अनेक ठिकाणी विकासात्मक कामे रखडली आहेत. या काळात प्रशासक नियुक्त करण्यात आले होते, परंतु त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, अशी नागरिकांची भावना आहे. आगामी मतदानाच्या वेळी हे मुद्दे चर्चेत येण्याची शक्यता आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/xE7f8aj

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.