राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने देशव्यापी अस्थिकलश यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेच्या माध्यमातून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या देशातील प्रमुख पवित्र नद्या आणि धार्मिक स्थळांवर अजितदादांच्या अस्थी विसर्जित केल्या जाणार आहेत. मंगळवारी बारामती येथील निवासस्थानी विधिवत पूजा पार पडल्यानंतर पार्थ अजित पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे हे अस्थिकलश सुपूर्द केले. “आदरणीय अजितदादांचे नेतृत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते. त्यांच्या विचारांना संपूर्ण देशाने स्वीकारले होते. वेळेअभावी जे समर्थक बारामतीला येऊ शकले नाहीत, त्यांना या यात्रेच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी मिळेल,” अशी भावना पार्थ पवार यांनी या वेळी व्यक्त केली. ही अस्थी कलश यात्रा ४ फेब्रुवारीपासून सुरू होऊन ७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या ४ दिवसांच्या कालावधीत यात्रा देशभरातील १० हून अधिक राज्यांतून प्रवास करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. दिल्ली येथील मुख्यालयात पूजन करून यात्रेचा सुरुवात होईल. उत्तराखंडमधील हरिद्वार (हर की पौडी), उत्तर प्रदेशातील प्रयागराज (संगम), वाराणसी (मणिकर्णिका घाट) येथे अस्थी विसर्जन होईल. बिहार (पटना), झारखंड, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि तामिळनाडू (कन्याकुमारी) या राज्यांतील प्रमुख तीर्थक्षेत्रांवर अस्थी विसर्जन व शोकसभांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. विचारांचा वारसा पोहोचवणार घराघरात अजित पवार यांनी राबवलेली विकासकामे, शेतकरी हिताची धोरणे आणि सामाजिक न्यायाची मूल्ये देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा संकल्प राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. या यात्रेचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा करत असून विविध राज्यांतील पदाधिकारी या नियोजनात सहभागी झाले आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/YMEy1w2
अजितदादांना मानवंदना; 10 राज्यांतील नद्यांत अस्थिविसर्जन:दिल्ली येथील मुख्यालयात पूजन करून यात्रेला सुरुवात; बिहार, झारखंड, पंजाबलाही जाणार
February 04, 2026
0