भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी विशेष सचिव अनिल जोशी यांनी प्रतिपादन केले की, संत गाडगे बाबांच्या विचारांची दशसूत्री आणि त्यांची सेवाभावी वृत्ती हाच मानवी जीवनाचा खरा आधार आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 'संत गाडगे बाबांची दशसूत्री आणि सेवाभावी संस्थांची भूमिका' या विषयावर आयोजित विशेष कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे होते, तर विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही.एम. मेटकर आणि श्री संत गाडगे बाबा अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे उपस्थित होते. जोशी यांनी आपल्या भाषणात गाडगेबाबांच्या 'दशसूत्री' कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी ऋणमोचन येथील घाट, विद्यार्थ्यांसाठी बांधलेली वसतिगृहे आणि स्वच्छतेचा झाडू यांसारख्या गाडगेबाबांच्या कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या मते, हा झाडू केवळ स्वच्छतेचे नाही तर मन स्वच्छ करण्याचे प्रतीक होते. अनिल जोशी पुढे म्हणाले की, संत गाडगे बाबांचे कीर्तन आणि भजन हे लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम होते. ते संत गाडगे बाबांना 'मास कम्युनिकेशनचे कुलगुरू' असे संबोधले. डॉ. व्ही.एम. मेटकर यांनी बाबांच्या दशसूत्रीचा प्रसार ही काळाची गरज असल्याचे सांगितले. माजी आमदार दिवंगत बबनराव मेटकर यांच्या पुढाकाराने आणि तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्यामुळे विद्यापीठात अध्यासन केंद्राची स्थापना झाल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी सांगितले की, संत गाडगे बाबांनी दिलेली दशसूत्री केवळ शब्दांचा समूह नसून ती निकोप समाजाच्या निर्मितीची गुरुकिल्ली आहे. दशसूत्रीचा आधार घेऊन सेवाभावी संस्था खऱ्या अर्थाने बाबांचा वारसा पुढे चालवत आहेत. या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून बाबांच्या विचार व कार्याचा प्रसार देश पातळीवर होत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. कार्यक्रमादरम्यान संत गाडगे बाबांच्या विचार व कार्यानुसार कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, नंददीप फाऊंडेशन, संत गाडगे बाबा बहुउद्देशीय संस्था, माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशन, संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघ, मातोश्री सुशिलाताई वृद्धाश्रम, संत श्री दोला महाराज वृद्धाश्रम, राजीव गांधी कृषी सेवाभावी संस्था, संत गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठान या संस्थांचा समावेश होता. तसेच श्रीमती डोईफोडे, संदीप चिस्तरकर व अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे यांचाही सत्कार करण्यात आला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/MWyo3bX
संत गाडगे बाबांची दशसूत्री जीवनाचा खरा आधार:माजी विशेष सचिव अनिल जोशी यांचे अमरावती विद्यापीठात प्रतिपादन
March 26, 2026
0