प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न सुरक्षा विभागाच्या पथकावर पाळत ठेवत जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गंगापूर तालुक्यातील रहीमपूर येथे सोमवारी (८ जून) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. सहायक आयुक्त विवेक पाटील, अधिकारी फरीद सिद्दिकी आणि नमुना सहायक अमोल कांबळे यांचे पथक वैजापूरहून रहीमपूर येथील एम.जी.के. रोलर फ्लोअर मिल परिसरात दाखल झाले. तेथे टेम्पोमध्ये (क्रमांक एमएच १६ सीडी ८२९६) मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवून ठेवण्यात आल्याचे आढळले. त्यानुसार त्यांनी शहानिशा करून कारवाई सुरू केली. त्यावेळी टेम्पोमध्ये २५ ते ३० गोण्या आढळून आल्या. त्यानुसार जप्तीची कारवाई सुरू असताना चारचाकीतून आलेल्या टोळक्याने पथकातील सदस्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर जप्त करण्यात येत असलेला टेम्पो पळवून नेला,अशी फिर्याद खाद्य सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी दिली आहे. दरम्यान, वाळूज पोलिसांना घटनेची माहिती मिळताच निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी घटनास्थळ गाठून आरोपींचा पाठलाग करून सुनिल जयराम ढोले (३३, रा. टेंभापुरी, ता. गंगापूर), सागर रामकिसन झळके (२५, रा. जिकठाण, ता. गंगापूर) यांना अटक करण्यात आली आहे. सध्या पसार आरोपी व टेम्पोचा शोध सुरू आहे. तर प्रभाकर सोळुंके (रा. लिंबेजळगाव), नजीर शेख, दत्ता सुभाष पाटेकर (३०, रा. तुर्काबाद), सद्दाम शेख, परशुराम गायकवाड (रा. बीड) व इतर यांच्यावर वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ वर्षांपूर्वी माल पकडला होता याच टोळीकडून २०२४मध्ये गुन्हे शाखेने कोट्यवधींचा माल पकडला होता. काही मंडळी रेकॉर्डवर आल्याने नव्या साथीदारांना घेऊन हा गोरखधंदा पुन्हा थाटला. त्यानुसार पाळत ठेवण्यासाठी जुनी मंडळी तर नव्या साथीदारांकडून मालाची वाहतूक केली जाते. यात कोट्यवधींची उलाढाल असल्याने बड्या मंडळींचा त्यांच्या मागे हात असल्याचीदेखील चर्चा जोरात आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/DsrJhCt
मध्यरात्रीचा थरार:गंगापूरला एफडीए अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून 30 गोण्या गुटखा पळवला, दोन जणांना अटक, पळवलेल्या टेम्पोचा शोध सुरू
June 09, 2026
0