Type Here to Get Search Results !

महत्त्वपूर्ण घोषणा:राज्य एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5% वाढ, घरभाडे भत्त्याच्या थकबाकीसाठी 100 कोटींची तरतूद

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ५३ टक्क्यांवरून थेट ५८ टक्के करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी केली. याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याच्या थकबाकीसाठी १०० कोटी रुपयांची विशेष तरतूदही करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर गुरुवारी एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून कर्मचारी संघटनांशी संवाद साधला व “सामंजस्याची भूमिका घेऊन एसटी अधिक सक्षम करण्यासाठी एकत्र काम करावे,” असे आवाहन केले. भविष्यात जेव्हा जेव्हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होईल, त्याच वेळी तो तत्काळ एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करावा, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला दिले. आमदार खोत, पडळकर एमडीवर धावून गेले कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी या बैठकीतून निषेध व्यक्त करत काढता पाय घेतला. या बैठकीदरम्यान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत त्यांची शाब्दिक चकमक उडाली. या वेळी आमदार खोत आणि पडळकर एमडीच्या अंगावर धावून गेल्याचेही समजते. मात्र मंत्री सरनाईक यांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण शांत झाले. महामंडळाचे वर्षाला ३०० कोटींचे झाले नुकसान राज्यात १४ हजार ५०० बसेस रस्त्यावर धावत असून, वर्षाला ३४०० कोटी रुपयांचे डिझेल लागते. डिझेलच्या दरवाढीमुळे एसटी महामंडळाला वर्षाला तब्बल ३०० कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागणार आहे. हा आर्थिक भार सहन करणे महामंडळाच्या कक्षेबाहेर गेले आहे. त्यामुळे एसटी भाड्यात वाढ करावी लागण्याचे संकेत परिवहनमंत्र्यांनी दिले होते.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/PWFCKe2

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.