Type Here to Get Search Results !

...आणिक दर्शन विठोबाचे!:पंढरपुरात पहाटे 3 वा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा; सलग 20 वर्षे वारी करणाऱ्या धाराशिवच्या माने दांपत्याला पूजेचा मान

श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस व मानाचे वारकरी दांपत्य यांच्या हस्ते परंपरेनुसार ही पूजा झाली. यंदा मुख्यमंत्र्यांसमवेत पूजा करण्याचा मान धाराशिव जिल्ह्यातील गौरगांवच्या बाबासाहेब माने (वय ७०) व प्रभावती माने (वय ६८) या वारकरी दांपत्यास मिळाला. शेतकरी असलेले माने दांपत्य गेल्या २० वर्षांपासून पंढरपूरची वारी करते. तत्पूर्वी मध्यरात्री १२.४५ वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले. त्यानंतर १ ते १.४५ पर्यंत समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते नित्यपूजा करण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सपत्नीक मंदिरात आगमन झाले. २ वाजून २० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा झाली. पहाटे ३ ते ३.३० दरम्यान रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली. यावेळी श्री विठ्ठलास मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेला बनारसी सिल्कचा लाल, केशरी रंगाचा पोशाख तर रुक्मिणीमातेस लाल, हिरव्या रंगाची येवला पैठणी परिधान करण्यात आली होती. विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न होताच पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले. त्यानंतर ३.४५ ते ४.३० दरम्यान सभामंडपात मुख्यमंत्री दांपत्य आणि मानाच्या वारकरी दांपत्याचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. महापूजेवेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, त्यांच्या पत्नी सोनिया गोरे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आदी उपस्थित होते. माउली, तुकोबांच्या पालखीवर पंढरपूरकरांची पुष्पवृष्टी तत्पूर्वी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत चांगदेव महाराज, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताबाई, रुक्मिणीमाता, संत निळोबाराय आणि संत नामदेव महाराज या मानाच्या पालख्यांसह इतर विविध संतांच्या पालख्या मजल-दरमजल करत शुक्रवारी रात्री नऊ वाजता पंढरपुरात दाखल झाल्या. इसबावी विसावा येथे प्रशासनाच्या वतीने पालख्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. माउली आणि तुकोबांच्या पालखीवर पंढरपूरकरांनी पुष्पवृष्टी केली. मुख्यमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण निर्णय: पंढरपुरात जागा हस्तांतरणाची कागदपत्रेही सुपूर्द सोलापूर शहरासाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या उड्डाणपूलाची उभारणी व नवीन पाणीपुरवठा योजना या दोन प्रकल्पांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आहेत. उड्डाणपुलांसाठी आवश्यक असलेल्या खासगी व राज्य शासनाच्या जागांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तर नवीन पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर व निविदा प्रक्रिया ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण करून ३० नोव्हेंबरपर्यंत काम मंजुरीसाठी तयार ठेवण्याचे निर्देश फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री शुक्रवारी पंढरीत आले होते. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी एन. कार्तिकेयन यांनी उड्डाणपुलांच्या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली. या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, मनपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्गाचे स्वप्निल कासार, संतोष देशमुख यांच्याकडे जागेच्या हस्तांतरणाची कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली. तीन दिवसांत दुसरा प्रकल्प मार्गी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच उड्डाणपुलांसाठी ३ ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. पण त्यासाठी जागांचे हस्तांतरण २५ जुलैपूर्वी होणे आवश्यक होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करत ९३ टक्के जागा हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. या निर्णयामुळे ३ ऑगस्ट रोजी नव्याने निविदा काढण्याची आवश्यकता राहणार नाही. सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे. सोलापूरच्या आयटी हब प्रकल्पासाठी बुधवारीच जलसंपदा विभागाची जागा एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यापाठोपाठ आता उड्डाणपुलाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेऊन दोन रखडलेले मोठे प्रकल्प तीन दिवसांत मार्गी लावण्यात सरकारला यश आले आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/AeDUcul

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.