Type Here to Get Search Results !

सरकारी नोकरीचे आमिष दाखवत बनावट नियुक्तीपत्रे दिली:117 युवकांची 3.73 कोटी रुपयांची फसवणूक, बारामती पोलिसांत गुन्हा

राज्य शासनाच्या विविध विभागांसह रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ११७ बेरोजगार युवकांची तब्बल ३ कोटी ७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आरोग्य, वन, जलसंपदा, समाजकल्याण, ओएनजीसी तसेच भारतीय रेल्वे अशा विविध सरकारी विभागांमध्ये नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी उमेदवारांकडून अर्ज भरून घेण्यात आले आणि लाखो रुपयांची आगाऊ रक्कम स्वीकारण्यात आली. राज्य शासनाच्या नोकरीसाठी प्रत्येकी सुमारे पाच लाख, तर रेल्वेतील नोकरीसाठी सहा लाख रुपये खर्च येईल, असे सांगून उमेदवारांकडून पैसे उकळण्यात आले. आरोपींनी पीडितांचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट निवड याद्या तयार केल्या. तसेच, खोटे शिक्के असलेली नियुक्तीपत्रे (जॉइनिंग लेटर) दिली. काही उमेदवारांना तर प्रशिक्षणासाठी पाठविल्याचाही बनाव करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात कोणालाही नोकरी मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू केला आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. या घोटाळ्यात रोख आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे रक्कम स्वीकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बेरोजगार युवकांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या अशा टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तातडीने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार करा.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Wi8QH5B

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.