दुष्काळी परिस्थिती, पाण्याचे दुर्भिक्ष आणि पारंपरिक पिकांमधून हाती येणारा अत्यल्प मोबदला यामुळे खचलेल्या शेतकऱ्यांसाठी नांदेड जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याचा प्रयोग आशेचा नवा किरण ठरत आहे. मुखेड तालुक्यातील उंद्री येथील संभाजी पाटील मुकनर यांनी आपल्या अवघ्या एक एकर ओसाड माळरानावर, जिथे वर्षाला सोयाबीनमधून केवळ 10 ते 12 हजार रुपये मिळत होते, तिथे ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड करून सर्व खर्च वजा जाता वार्षिक दीड लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवून दाखवले. हे उत्पन्न सोयाबीनच्या तुलनेत थेट 12 पट अधिक आहे. शेतीत सातत्याने नवे प्रयोग करण्याची आवड असलेल्या पाटील यांनी चार वर्षांपूर्वी ड्रॅगन फळ लागवडीचा निर्णय घेतला. त्यावेळी मराठवाड्यात या पिकाची रोपे उपलब्ध नसल्याने त्यांनी थेट सांगोला येथून ‘जंबो रेड' जातीची रोपे आणून लागवड केली. वेलवर्गीय पीक असल्याने सिमेंटचे खांब आणि रिंगच्या साहाय्याने बाग फुलवली. एक एकरात 650 सिमेंटचे खांब उभारून त्यावर सुमारे 2,600 रोपांची लागवड केली. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने जोपासलेल्या या बागेतून सरासरी 5 हजार किलो उत्पादन मिळत आहे. कमी पाण्यातही दर्जेदार उत्पादन मिळत असल्याने हे पीक दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी आशादायी पर्याय ठरत आहे. संभाजी पाटील मुकनर आपल्या बागेतील फळांची ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांना विक्री करतात. साडेचार लाखांची गुंतवणूक शेतकरी मुकनर प्रारंभी साडेचार लाखांची गुंतवणूक करून ड्रॅगन फ्रूट शेतीत यश मिळवले. आधुनिक पद्धतीने घेतलेल्या या शेतीतून दरवर्षी सुमारे दीड लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळते. परिसरातील व्यापारी त्यांच्या शेतात येऊन माल खरेदी करतात. त्यामुळे वाहतूक खर्चात बचत होते. दरम्यान, ड्रॅगन फ्रूट हे फायबर, लोह, अँटिऑक्सिडंट्स आणि विविध जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेले हे फळ आरोग्यासाठीही लाभदायक मानले जाते. (प्रगतिशील शेतकरी संभाजी पाटील-मुकनर यांचा मोबाइल नंबर 7058293333)
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/rNoSIvD
प्रगतिशील शेतकरी:ओसाड माळरानावर ड्रॅगन फ्रूटची लागवड; उत्पन्न 12 पट वाढले, एकरी दीड लाखाची कमाई, नांदेडच्या शेतकऱ्याचा प्रयोग
August 09, 2026
0