लासूरस्टेशन गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा येथे गेल्या दहा वर्षांपासून शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या सहकार्याने सुरू असलेले टोमॅटो व्यापार संकुल हे मराठवाड्यातील महत्त्वाचे टोमॅटो बाजार म्हणून ओळखले जाते. या व्यापार संकुलातून दरवर्षी हजारो टन दर्जेदार टोमॅटो महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा आदी राज्यांमध्ये निर्यात केला जातो. या बाजारपेठेने परिसरातील हजारो टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचे आणि विश्वासाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२६ पासून नव्या हंगामातील टोमॅटो खरेदीचा शुभारंभ होणार असून, त्यासाठी संकुलाने विशेष नियमावली जाहीर केली आहे. शेतकऱ्यांकडून टोमॅटोची खरेदी लिलाव पद्धतीने केली जाणार असून व्यवहारात पारदर्शकता राखण्यासाठी रोख किंवा ऑनलाइन स्वरूपात तात्काळ पैसे देण्याची सोय करण्यात आली आहे. वजनातील अचूकता, दर्जानुसार वर्गवारी, शिस्तबद्ध वाहतूक आणि शेतकरी-व्यापारी यांच्यात पारदर्शक व्यवहार राहण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. व्यापारी पंढरीनाथ आप्पा गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये सुरू झालेल्या या टोमॅटो मार्केटमध्ये आज जवळपास ४० व्यापाऱ्यांचे शेड उभारण्यात आले आहेत. हंगामात राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व दिल्लीसह देशभरातून ८० हून अधिक बडे व्यापारी खरेदीसाठी येथे दाखल होतात. रोज लिलावातून खरेदी केलेला माल देशभराच्या कानाकोपऱ्यात पाठवला जातो. दरम्यान, आम्ही अनेक वर्षांपासून टोमॅटो खरेदी करतो, परंतु आजपर्यंत एकाही शेतकऱ्याचा रुपया बुडालेला नाही. अधिकृत बाजारपेठेचे नियम पाळून योग्य भाव दिला जात असल्यानेच दररोज ५०० ते ८०० वाहनांतून आवक होते, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. यंदाच्या हंगामातही शेतकऱ्यांनी दर्जेदार माल आणून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. गवळीशिवरा मार्केटमध्ये टोमॅटोची अशाप्रकारे आवक होते. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशातील मजूर या टोमॅटो मार्केटमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. चार महिन्यांच्या टोमॅटो हंगामात उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील तब्बल ७०० कामगार कुटुंबीयांसह येथे दाखल होतात. ४० शेडवर टोमॅटो छाटणे आणि ट्रकमध्ये कॅरेट भरण्याच्या कामातून त्यांना दररोज ८०० रुपये मजुरी मिळते. याशिवाय वाहतूक व पॅकिंग व्यवसायालाही मोठा दिलासा मिळतो.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/RnEa2yI
गवळीशिवऱ्यात 15 ऑगस्टपासून टोमॅटो मार्केट,: संकुलाकडून नियमावली जाहीर, अनेकांच्या हाताला मिळणार रोजगार
August 08, 2026
0