शासनाची सुरक्षित मानली जाणारी आय-सरिता प्रणाली कशी सहज भेदली जाते, याचा एक प्रकार उघडकीस आला आहे. एका जिल्हा परिषद शिक्षक मुलानेच स्वतःच्या जन्मदात्या आईच्या जागी दुसऱ्याच एका अनोळखी महिलेला उभी करून तिची २० गुंठे जमीन हडपली आहे. विशेष म्हणजे, बनावट आधार कार्डचा वापर करून आणि दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व्हर डाऊन असल्याचा बनाव रचून हा दस्त ऑफलाइन पद्धतीने नोंदवला. चिंचोली लिंबाजी (ता. कन्नड) येथील ६५ वर्षांच्या लक्ष्मीबाई कडुबा सपकाळ यांनी या प्रकरणी सिटी चौक पोलिसांत फिर्याद दिली. त्यांचा मोठा मुलगा भागवत सपकाळ हा शिक्षक आहे. लक्ष्मीबाई यांनी १९९९ मध्ये शरणापूर येथे ४० गुंठे जमीन घेतली होती. आजारपणासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी २० गुंठे जमीन १५ लाखांना विकत घेण्याची गळ मुलाला घातली होती. मात्र, त्याने नकार देत आई-वडिलांना हुसकावून लावले. नंतर ७/१२ उतारा काढल्यावर मुलाने परस्पर ही जमीन हडपल्याचा प्रकार समोर आला. असा रचला फसवणुकीचा कट मुलाने दुय्यम निबंधक कार्यालयात आईच्या जागी दुसरीच महिला उभी केली. शहरात एका डीटीपी सेंटरवर मूळ कार्डवर फोटो एडिट करून तिचे बनावट आधार कार्ड बनवले. त्याआधारे १७ फेब्रुवारी २०२५ रोजी खोटे मुखत्यारपत्र तयार केले. यावर सून सुनीता व घनश्याम गंगावे यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षऱ्या केल्या. याच खोट्या मुखत्यारपत्राचा आधार घेत, ४ एप्रिल २०२५ रोजी बनावट बक्षीसपत्र करून मुलाने जमीन स्वतःच्या नावावर लाटली. यात सुशील बोराडे याने साक्षीदार म्हणून सहभाग नोंदवला. ‘ऑफलाइन’चा घोटाळ्याचा फंडा राज्यातील सर्व दस्त नोंदणी ‘आय-सरिता’ या प्रणालीवर ऑनलाइन होते. रजिस्ट्रीसाठी वेबकॅमद्वारे फोटो आणि बायोमेट्रिक पडताळणी होते. मात्र, ‘डमी’ महिलेचे बिंग फुटेल या भीतीने, सर्व्हर डाऊन असल्याचे कारण पुढे करत अधिकाऱ्यांशी संगनमत करून हा दस्त ऑफलाइन मंजूर केल्याचा संशय आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील संबंधित ऑफलाइन रजिस्टर जप्त करून त्याची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवणे सुरू या प्रकरणी भागवत सपकाळ, सून सुनीता, घनश्याम गंगावे, सुशील बोराडे आणि डमी महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुठाळ करत आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/OlykfKB
शिक्षकाने आईची 20 गुंठे जमीन ‘ऑफलाइन रजिस्ट्री’द्वारे हडपली:आय-सरिता प्रणालीला बगल; खोटे मुख्त्यारपत्र तयार केले
August 13, 2026
0