Type Here to Get Search Results !

नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी:सोयगाव तालुक्यामध्ये रानडुकरांचा धुमाकूळ, आमखेडा, वेताळवाडी, सोयगावसह 20 गावांतील शेतकरी त्रस्त‎

तालुक्यात वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने भीषण रूप धारण केले असून आमखेडा, गलवाडा, वेताळवाडी, सोयगाव, सोनसवाडी, रावेरी, कंक्राळा, जरंडी, निंबायती, रामपूर तांडा, बहुलखेडा, उमरविहिरे, घोसला, नांदगाव तांडा, तिडका, बोरमाळ आणि बनोटी शिवारात रानडुकरांच्या झुंडींनी उभा थैमान घातला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच उडीद व मुगाचे नुकसान झालेले असताना, आता हातातोंडाशी आलेल्या मका पिकावर रानडुकरांनी डल्ला मारल्याने २० गावांतील शेतकरी हवालदिल झाले आहेत. डोंगरालगत असलेल्या शेतांमध्ये रात्रीच्या वेळी रानडुक्कर व रोही (निलगाय) यांचे कळप घुसून पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे रात्रीच्या वेळी शेतात राखणीसाठी जाणेही शेतकऱ्यांच्या जीवावर बेतणारे ठरत आहे. दरवर्षी हा त्रास सहन करावा लागत असल्याने वनविभागाच्या दुर्लक्षाबद्दल शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. घोसला येथील कमलबाई रामदास पाटील म्हणाल्या माझ्या १ हेक्टर क्षेत्रातील मक्याचे रानडुकरांनी प्रचंड नुकसान केले. दरवर्षी हेच घडते. वनविभागाने संवेदनशील भागात तार कुंपण उभारून आर्थिक मदत द्यावी. आमखेडा येथील अशोक ढगे म्हणाले सोनसवाडी शिवार डोंगराला लागून असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने तातडीने पिकांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलावीत. ज्ञानेश्वर गाडेकर यांनी सांगितले, पावसाने ताण दिल्यामुळे कपाशी सुकत आहे, त्यात रानडुक्कर आणि रोही पिकांचा फन्ना उडवत आहेत. आम्ही दुहेरी संकटात सापडलो आहोत. तर विष्णू तोताराम ढगे म्हणाले माझ्या १ हेक्टर ८० आर क्षेत्रातील मका पिकाचे वन्यप्राण्यांमुळे ६० टक्के नुकसान झाले आहे. तोंडाशी आलेला घास हिरावल्याने तात्काळ भरपाई द्यावी. वनविभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी वनविभागाने तातडीने सर्व बाधित शिवारांची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, तसेच शेतीभोवती तार कुंपण उभारण्यासाठी अनुदान देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी तालुकाभरातून होत आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/2W7mLgd

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.