Type Here to Get Search Results !

संभाजीनगरात 15 हजारांच्या नफ्यासाठी पिस्तूल विक्री:6 पदवीधरांची टोळी अटकेत, एमपीतून आणले शस्त्र; 4 पिस्तूल, 11 काडतुसे जप्त

शहरातील उच्चभ्रू भागात राहणाऱ्या ६ पदवीधर तरुणांच्या टोळीला सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जास्त नफा कमावण्यासाठी मध्य प्रदेशातून पिस्तूल आणून शहरात विकणारी ही साखळी होती. या कारवाईत पोलिसांनी ४ पिस्तूल आणि ११ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले आणि निरीक्षक अतुल येरमे यांनी ही माहिती दिली. मयूर पार्क आणि जाधववाडी भागात एका तरुणाने मध्य प्रदेशातून पिस्तूल आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सुरेवाडीतून शिवा अंबादास सुरे याला ताब्यात घेतले. त्याच्या माहितीवरून सुमीत विसपुते याच्या खोलीतील पाण्याच्या टाकीतून एक पिस्तूल आणि २ काडतुसे जप्त करण्यात आली. या दोघांच्या चौकशीतून सत्यम चाटे आणि अर्जुन लिंगायत यांची नावे समोर आली. पोलिसांनी सत्यमच्या कमरेला अडकवलेले एक पिस्तूल जप्त केले. तर अर्जुनने जाधववाडी मोंढा भागातील झुडपात लपवलेली आणखी २ देशी पिस्तूल पोलिसांच्या हवाली केली. उर्वरित काडतुसे श्रीकांत शिखरेकडून ५ आणि विशाल भोसलेकडून ४ याप्रमाणे जप्त करण्यात आली. आरोपींवर यापूर्वी दंगल, सायबर फसवणूक आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. १५ हजारांचे पिस्तूल ४५ हजारांना मध्य प्रदेशातील झारवट आणि उमरी येथील अड्ड्यांवरून १५ ते २० हजार रुपयांना एक पिस्तूल आणले जायचे. पकडले जाण्याच्या भीतीने शस्त्रे एकाच जागी न ठेवता सर्वांमध्ये वाटून ठेवली जायची. गिऱ्हाईक शोधून हे तरुण एका पिस्तुलामागे १० ते २० हजार रुपयांचा नफा कमवत होते. त्यांनी एक पिस्तूल ३५ हजार तर दुसरे ४५ हजार रुपयांना विकल्याचे तपासात उघड झाले. बंटी दीक्षित खुनातील आरोपीच्या पिस्तुलाशी साम्य बंटी दीक्षित खून प्रकरणातील आरोपी पवन पराशर याच्याकडे सापडलेले पिस्तूल आणि या टोळीकडून जप्त केलेले पिस्तूल एकाच बनावटीचे आहे. त्यामुळे दोन्ही गुन्ह्यांतील शस्त्रांचा मुख्य पुरवठादार एकच असल्याचा पोलिसांचा संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Hjq9UrK

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.