Type Here to Get Search Results !

कोकणच्या विकासासाठी निसर्ग-अर्थव्यवस्थेचा समतोल आवश्यक:मत्स्य व्यवसाय, पर्यटन आणि आंबा-काजू उत्पादनावर चर्चासत्रात मंथन

कोकणचा निसर्ग, जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन करताना स्थानिकांच्या आर्थिक विकासाला चालना देणारी दिशा निश्चित करणे आवश्यक आहे, असा सूर ‘कोकणचा शाश्वत विकास’ या विषयावरील चर्चासत्रात उमटला. एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन (पुणे) आणि बॅ. नाथ पै सेवांगण (मालवण) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चर्चासत्रात १५० हून अधिक पर्यावरणप्रेमी, कार्यकर्ते आणि प्रतिनिधींनी सहभाग घेतला. साथी किशोर पवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. विध्वंसक मासेमारीला आळा घालण्याची गरज पहिल्या सत्रात मत्स्य दुष्काळ आणि मच्छीमारांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. डॉ. केतन चौधरी यांनी मत्स्यसाठ्यांचे संवर्धन करण्यासाठी जबाबदार मासेमारी आवश्यक असल्याचे सांगितले. स्फोटके, विषारी पदार्थ आणि व्यावसायिक मासेमारीसाठी एलईडी दिव्यांचा वापर बंद करण्याची गरज त्यांनी मांडली. नौकांची वाढती संख्या आणि मत्स्यसाठ्यांवरील अतिरिक्त ताण यामुळे मच्छीमारांचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पर्यटनातून निसर्गाचे संरक्षणही व्हावे शाश्वत पर्यटनावरील सत्रात डॉ. सुमेधा नाईक यांनी पर्यटकांना अनुभव, स्थानिकांना उत्पन्न आणि निसर्गाला संरक्षण देणारे पर्यटन हे कोकणच्या विकासाचे उद्दिष्ट असावे, असे सांगितले. समुद्र, किल्ले, लोकसंस्कृती आणि परिसंस्थांचे संवर्धन करत पर्यटनाचा विकास करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या सत्रात मल्हार इंदुलकर आणि प्रसाद गावडे यांनीही सहभाग घेतला. हापूससाठी संशोधन आणि सक्षम वाण हवे आंबा-काजू उत्पादनावरील सत्रात व्ही. के. सावंत यांनी हापूस आंब्याचे बदलत्या हवामानाला तोंड देऊ शकणारे सक्षम वाण विकसित करण्यासाठी संशोधनाची गरज व्यक्त केली. सघन लागवड तंत्रज्ञान, अतिउष्णतेबाबत शेतकऱ्यांना पूर्वसूचना, आंबा-काजू उत्पादकांसाठी निविष्ठांची सामुदायिक खरेदी आणि मोनो कल्चरचे दुष्परिणाम टाळण्यासाठी अन्य वृक्षांची लागवड यावर त्यांनी भर दिला. चर्चासत्राची भूमिका सुभाष वारे यांनी मांडली. प्रा. प्रवीण बांदेकर, अभिजित हेगशेट्ये आणि युयुत्सु आर्ते यांनी पुढील वाटचालीची दिशा मांडली. देवदत्त परुळेकर यांनी समारोप केला. उपेंद्र टण्णू यांनी सूत्रसंचालन, तर लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/paCwckS

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.