Type Here to Get Search Results !

ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळीवर MPDAची कठोर कारवाई:गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर 1 वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध

सत्ताधाऱ्यांवर आक्रमक टीका आणि आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद विठ्ठल कोळी (वय 37, रा. अर्धनारी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. शरद कोळी यांच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळू तस्कर तसेच इतर विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी असलेल्या MPDA कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनुसार त्यांना तब्बल एक वर्षासाठी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याने ही कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार शरद कोळी यांना येरवडा कारागृहात हलविण्यात आले. या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, आगामी विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कारवाईकडे राजकीयदृष्ट्याही पाहिले जात आहे. गुन्ह्यात फरार असताना सांगलीतून ताब्यात पोलिसांच्या माहितीनुसार, शरद कोळी हे काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेतल्यानंतर त्यांना सांगली येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधातील यापूर्वीच्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी आणि त्यांच्या कथित कृत्यांचा आढावा घेण्यात आला. सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेश क्रमांक २०२६/डी.सी.बी/२/आरआर/४७६१(१)/२०२६, दिनांक 17 सप्टेंबर 2026 अन्वये शरद कोळी यांच्याविरोधात स्थानबद्धतेची कारवाई निश्चित करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर येरवडा कारागृहात रवानगी रविवारी, 4 ऑक्टोबर रोजी शरद कोळी यांची पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्तात त्यांना पुण्याकडे रवाना केले. त्यानंतर त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धता करण्यात आली. या कारवाईमुळे शरद कोळी यांना पुढील एक वर्ष येरवडा कारागृहात स्थानबद्ध राहावे लागणार आहे. कोणत्या कारणांमुळे MPDA अंतर्गत कारवाई? पंढरपूर तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद कोळी यांच्याविरोधात सोलापूर आणि परिसरात विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यामध्ये वाळू चोरी आणि वाळू तस्करी, व्यापारी तसेच नागरिकांकडून खंडणीची मागणी करणे आणि सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे देऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, अशा आरोपांचा समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कथित विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी MPDA कायद्याचा आधार घेण्यात आला आहे. महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी असलेल्या 1981 च्या MPDA कायद्यातील कलम 3(1) अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण शरद कोळी हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उपनेते असून, सत्ताधारी पक्षांवर आक्रमक पद्धतीने टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. विविध राजकीय मुद्द्यांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेली वक्तव्ये यापूर्वीही चर्चेत आली आहेत. आता विधानसभा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची राजकीय तयारी सुरू असतानाच त्यांच्यावर MPDA अंतर्गत एक वर्षाच्या स्थानबद्धतेची कारवाई झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईकडे राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात असून, पुढील काळात यावरून आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शरद कोळी यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई त्यांच्या विरोधातील दाखल गुन्हे आणि पोलिसांनी मांडलेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या कारणांच्या आधारे करण्यात आली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हेही वाचा… विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभिजित दिपकेंची भेट:शिक्षण, मतदान आणि उद्योगांवरून सरकारवर निशाणा धर्म आणि जात धोक्यात असल्याच्या भावनिक मुद्द्यांवर मतदान करण्याऐवजी शिक्षण, रोजगार, रस्ते आणि पेपरफुटीसारख्या प्रश्नांवर मतदारांनी विचार करायला हवा, असे म्हणत कॉकऱोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकार आणि मतदारांच्या राजकीय भूमिकेवर टीका केली. पुण्यात विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला दिपके यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील उद्योग, शिक्षण व्यवस्था, मतदानाचा अधिकार आणि सरकारच्या कारभारावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. सविस्तर वाचा…

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/WhtjkRn

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.