सेनगाव येथे आई, वडिलांना भेटून दुचाकी वाहनावर हिंगोलीकडे परत येतांना भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ता. 18 रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील एनटीसी रितेश अग्रवाल यांचे औषधी विक्रीचे दुकान आहे. आज रात्री ते कुटुंबियांसह धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी जाणार होते. त्यामुळे ते दुपारच्या सुमारास दुचाकी वाहनावर सेनगाव येथे त्यांच्या आई, वडिलांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांना भेटून रात्रीच्या वेळी हिंगोली येथे घरी परत येत होते. त्यांचे दुचाकी वाहन हिंगोली ते सेनगाव मार्गावर देऊळगाव शिवारात आले असतांना भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे दुचाकीवरील रितेश जागीच कोसळले. या अपघाताची माहिती मिळताच नर्सी नामदेव पोलिस ठाण्याचे जमादार धोंडीबा दिघाडे, गणेश नरोटे, नंदकिशोर महाजन यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने रितेश यांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या अपघाताची माहिती मिळताच औषध विक्रेता संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात धाव घेतली आहे. एक मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या रितेश यांच्या मृत्यूमुळे हिंगोली जिल्हा औषध विक्रेता संघटनेवर शोककळा पसरली आहे. मयत रितेश यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/uc98pqx
देऊळगाव शिवारात भरधाव कारची दुचाकीला धडक एक जण ठार:आई वडिलांना भेटून हिंगोलीत परततांना झाला अपघात
January 18, 2025
0