Type Here to Get Search Results !

डिग्रसवाणी शिवारात रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला:शेतकरी गंभीर जखमी, उपचारासाठी लक्ष्मी लाईफ केअर रुग्णालयात दाखल

हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी शिवारामध्ये शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर शनिवारी ता. 19 सायंकाळी रानडुकराने हल्ला करून शरीराचे अक्षरशः लचके तोडले. सुमारे आठ ते दहा ठिकाणी चावा केलेल्या जखमा असून त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोली येथील लक्ष्मी लाइफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा शेतकऱ्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील संतोष आढळकर यांचे डिग्रसवाणी शिवारात शेत आहे. नेहमीप्रमाणे आढळकर हे आज सकाळी शेतात गेले होते. दिवसभर काम करून सायंकाळी घरी निघण्याच्या तयारीत होते. यावेळी एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या आल्यामुळे आढळकर घाबरून गेले. त्यांना प्रतिकारही करता आला नाही. सुरुवातीला रानडुकराने दिलेल्या धडकेत ते खाली कोसळले. त्यानंतर रानडुकराने अक्षरशः त्यांच्या शरीराचे लचके तोडण्यास सुरुवात केली. त्यांच्या हाताला, पायाला, पोटाजवळ रानडुकराने चावा घेऊन फोडून काढण्यास सुरुवात केली. यावेळी आढळकर यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारीच असलेल्या एका शेतकऱ्याने तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर रानडुकर पळून गेले. मात्र तोपर्यंत रानडुकराने आढळकर यांच्या हाताला, पायाला, पोटाला आठ ते दहा ठिकाणी चावा घेऊन फोडून काढले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आढळकर यांना उपचारासाठी तातडीने हिंगोली येथील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेमध्ये आढळकर यांचा एक हात पूर्णपणे निकामी झाला. या घटनेची माहिती मिळताच कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी रुग्णालयात येऊन आढळकर यांची चौकशी केली. दरम्यान, रात्री उशिरा आढळकर यांच्यावर डॉ. अखिल अग्रवाल, डॉ. असोले, डॉ. महेश मोरे, डॉ. पंजाब शेळके, डॉ. श्रीराम मोरे, डॉ. अविनाश कदम, डॉ. मयुर अग्रवाल यांच्या पथकाने शस्त्रक्रिया सुरू केली होती. आमदार संतोष बांगर यांनी या प्रकाराची माहिती वनविभागाला देऊन आढळकर यांना तातडीने मदत देण्याबाबत सूचना केल्या आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/JG13BcC

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.