स्वारगेट एसटी स्थानकातील तरुणीवरील बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी दत्तात्रय गाडे याने प्रेमविवाह करून सुखाने संसार सुरू केला होता. त्याला सात वर्षांचा मुलगादेखील आहे. मात्र, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने तो कामधंदा करत नव्हता. त्यामुळे पत्नीशी व कुटुंबीयांशीही त्याचे सातत्याने वाद सुरू होते. त्याचा भाऊ शेती करतो. मात्र, आरोपी शेतीकडेही लक्ष न देता विविध ठिकाणी फिरत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो समलैंगिक संबंध ठेवत होता. यातून त्याला काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत असल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे. घटनेच्या दिवशी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास स्वारगेट पोलिसांचे एक पथक थेट त्याच्या घरी चौकशीस आल्यानंतर त्यांनी आरोपीसारखे साधर्म्य असलेल्या भावाला उचलून तपास सुरू केला. ही माहिती आरोपीलादेखील समजली. कधीही न बोलणाऱ्या चुलत भावाचा त्याला फोन आला. या वेळी त्याने घरी आई पडल्याचे सांगितल्याने आरोपीला संशय आला व त्याने त्याचा फोनच बंद करून पलायन केले. याचदरम्यान गुन्हे शाखेचे पथक व स्वारगेट पोलिसांनी आरोपीच्या गावाच्या परिसरातील शेताकडे तो गेल्याची माहिती मिळाल्याने शोध सुरू केला. पोलिसांची १६ ते १७ पथके, ग्रामस्थ, पोलिस पाटील, गावातील तरुणांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्याचसोबत जवळपासच्या पाच ते सहा गावांतील ग्रामस्थांनाही बोलावून पोलिसांनी साडेतीन हजार लोकांची बैठक घेत त्यांना शोधमोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले. श्रीगोंदा, दौंड, अहिल्यानगरच्या बसस्थानकातही फिरला श्रीगोंदा, दौंड, स्वारगेट, अहिल्यानगर भागात तो बसस्थानक, रेल्वेस्थानक येथेदेखील यापूर्वी फिरल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित ठिकाणी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. त्याचे मित्र, नातेवाइकांची मुक्काम ठिकाणेदेखील पोलिसांनी शोधून काढली होती. दरम्यान, दत्तात्रय गाडेच्या फाशीच्या शिक्षेसाठी युवक काँग्रेसकडून लष्कर पोलिस चौकीसमोर आंदोलन करण्यात आले. तसेच प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी घेऊन त्याला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. वर्षभराच्या डेटाचे केले पोलिसांनी विश्लेषण आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करत वर्षभरात तो नेमका कुठे कुठे फिरलेला आहे, त्याने कुणाला अधिक प्रमाणात संपर्क केला, त्याचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, त्याची स्वभाववैशिष्ट्ये काय आहेत, यावरून त्याचा सविस्तर अहवाल तयार केला होता. पंढरपूर, उज्जैन, शिर्डी, शनिशिंगणापूर आदी ठिकाणी तो मागील काही काळात गेल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी या ठिकाणी पोलिस पथके पाठवण्याची तयारी केली होती. शेतातील ऊस-टोमॅटोने भागवली भूक गुनाट गावाच्या परिसरातील १०० ते १५० एकर परिसरात घनदाट ऊस क्षेत्र असल्याने पोलिसांना तपासकामात अडचणी येत होत्या. याचा फायदा घेऊन आरोपी सुरुवातीला उसाच्या शेतात मळकट कपडे, अनवाणी पायाने आतल्या भागात फिरत राहिल्याने पोलिसांना तो सापडला नाही. या कालावधीत तो शेतातील ऊस व टोमॅटो खाऊन राहत होता. परंतु पाणी व भूक अधिक लागल्याने तो शेतातून बाहेर पडल्यावर सुरुवातीला दोन ग्रामस्थांना दिसला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/BJowMOX
प्रेमविवाहानंतर आरोपीस सात वर्षांचा मुलगा:तरीही समलैंगिक संबंध ठेवून कमवायचा पैसे, आराेपी गाडेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे
February 28, 2025
0