ब्रँडेड तेलानेच शनिदेवाचा तैलभिषेक करण्यास शनिवारपासून सुरुवात झाली. पहिलाच शनिवारी ब्रँडेड तेलाची शिंगणापुरात टंचाई भासली. सायंकाळपर्यंत दोन हजार भाविकांनी चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. मात्र त्यातील ४०० भाविकांना ब्रँडेड तेल मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांना चौथऱ्यावर जाऊनही तैलाभिषेक करता आला नाही. शनिशिंगणापुरात दिवसभरात ४० हजार भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. गत शनिवारी म्हणजेच २२ फेब्रुवारीला ४५ हजार भाविक येथे दाखल झाले होते. या शनिवारी ५ हजारांनी भाविकांची संख्या घटली. शनिशिंगणापूरला शनिवारपासून भाविकाकडे ब्रँडेड तेल असले तरच चौथऱ्यावर जाऊन तैलाभिषेक करू दिला जात आहे. त्यासाठी शनैश्वर देवस्थानचे कर्मचारी मुख्य प्रवेशद्वारावर भाविकांनी सोबत आणलेल्या तेलावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दिवसभर चौथऱ्यावरच्या दर्शनरांगेत भाविकांची गर्दी वाढलेली होती. आज एक मार्चपासून शनिदेवाच्या शिळेवर फक्त ब्रँडेड तेलाचा अभिषेक घालू देण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे. शनिशिंगणापूर देवस्थान व शिंगणापूरच्या ग्रामसभेत तसा ठराव घेण्यात आला. शनिदेवाच्या शिळेची केमिकलयुक्त तेलाने झीज होऊ नये यासाठी देवस्थानने हा निर्णय घेतला आहे. भाविकांसाठीच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवस्थानचे कर्मचारी सतर्क आहेत. भाविकांनी सोबत आणलेल्या तेलाची बाटली, तेलाचे डबे भारतीय अन्न सुरक्षा व मानके यांचे मान्यता प्राप्त आहेत की नाहीत यावर देवस्थान कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. भेसळीच्या तेलाला प्रतिबंध बसणार शनिशिंगणापुरात आता भेसळीचे तेल हद्दपार होऊ लागले आहे. या परिसरात तेलाचे पाच होलसेल विक्रेते आहेत. आता त्यांनीच फक्त ब्रँडेड तेलाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खरेदीदार शिंगणापुरातील छोट्या-मोठ्या दुकानांतून भेसळीच्या तेलाला प्रतिबंध बसणार आहे. तेलाची विक्री करणारी ३०० दुकाने येथे आहेत. देवस्थानकडून भाविकांच्या हिताचे अनेक निर्णय देवस्थानने भाविकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. सुरुवातीला फक्त पुजारीच चौथऱ्यावर जाऊ शकत असे. त्यानंतर भाविकांना ओल्या वस्त्रानिशी सोवळे नेसून चौथऱ्यावर जाण्याची प्रथा होती. त्यात भाविकांची लुबाडणूक होत असल्याचे दिसताच ती प्रथा देवस्थानने बंद केली. आता भाविकांना सोवळ्याविना चौथऱ्यावर दर्शन घेऊ शकतात. शनिदेवाच्या चौथऱ्यावर फक्त पुरुषांनाच प्रवेश दिला जात असे. २०१६ मध्ये लिंगभेदाला खतपाणी घालणारी ही प्रथा बंद करून महिलांनाही चौथऱ्यावर प्रवेश मिळवून दिला. मात्र, यासाठी मोठे वादंग व आंदोलनही झाले होते. एका तरुणीने अनाहुतपणे चौथऱ्यावर जात शनिदेवाचे दर्शन घेतल्याने मोठा गदारोळही झाला होता.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/oFhSGNj