महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले पु.ल. देशपांडे यांचा २५ वा स्मृतिदिन आणि सुनिता देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पु. ल. परिवाराच्या सहयोगाने अव्याहतपणे चालू असलेला आणि कोरोना काळात बंद पडलेला 'ग्लोबल पुलोत्सव' पुन्हा सुरू करण्यात येत असून दिनांक ९ ते १२ जून २०२५ या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर, कलादालन आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे या महोत्सवाचा दिमाखदार सोहळा रंगणार आहे. यानिमित्त यंदाचा पुलोत्सव जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांना, पु.ल. स्मृती सन्मान ज्येष्ठ चित्र-नाट्य रंगकर्मी सई परांजपे यांना, विशेष सन्मान स्व. प्रभा अत्रे यांना, तर पु.ल. कृतज्ञता सन्मान चिंतामणी हसबनीस यांना प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे निमंत्रक राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्य कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.चे सुशील जाधव, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लोकमान्य कल्चरल फाउंडेशनच्या आभा औटी, बेलवलकर हाउसिंगचे समीर बेलवलकर, कार्टूनिस्ट कंबाईनचे चारुहास पंडित आदी उपस्थित होते. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्याच्या प्रवेशिका शनिवार दिनांक ७ जूनपासून सकाळी ९.०० ते ११.३० आणि संध्याकाळी ५.०० ते ८.०० या वेळात बालगंधर्वच्या तिकीट खिडकीवर मिळणार आहेत. 'कोहिनूर ग्रुप' प्रस्तुत व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. आयोजित ग्लोबल पुलोत्सवाला स्किन सिटी, बेलवलकर हाउसिंग, लोकमान्य कल्चरल फाउंडेशन, प्रथमेश कन्स्ट्रक्शन्स तसेच कार्टूनिस्ट कंबाईन, महाराष्ट्र साहित्य परिषद व एन.एफ.डी.सी. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या 'ग्लोबल पुलोत्सवा'चे उद्घाटन सोमवार दिनांक ९ जून रोजी संध्याकाळी ६.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते होणार आहे. संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे स्व. प्रभा अत्रे यांच्या 'स्वरमयी' संस्थेस विशेष पु.ल. पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यावेळी स्व. प्रभा अत्रे यांच्या 'स्वरमयी' तर्फे सांगीतिक सादरीकरण होणार आहे. पुलंची पुस्तके आणि दृक-श्राव्य साहित्याचा समावेश असलेल्या 'पुस्तकवाला' यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन यानिमित्त होणार आहे. यानंतर रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ५० कलाकारांचा सहभाग असलेला 'जावे पुलंच्या गावा' हा दृक-श्राव्य कार्यक्रम सादर होणार आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/F8gEXjW
पुलोत्सव 2025 मध्ये मान्यवरांचा सत्कार:उस्ताद अमजद अली खान यांना जीवन गौरव, सई परांजपे यांना पु.ल. स्मृती सन्मान जाहीर
June 03, 2025
0