तालुक्यातील जवखेडे खालसा येथील कान्होबा ऊर्फ तांबुळ देवस्थान येथे गुरुवारी आरती करण्यावरून दोन समाजात शाब्दिक चकमक झाली. त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलिस अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होत दोन्ही गटाला शांतता राखण्याचे आवाहन उपस्थित पोलीस प्रशासनाने केले. जवखेडे खालसा येथून दोन किमी अंतरावर असलेल्या कान्होबा ऊर्फ तांबुळदेव देवस्थान येथे दोन समाजात गेल्या काही दिवसापासून धार्मिक विधी करण्यावरून वादविवाद सुरू आहेत. यापूर्वीही पोलिस प्रशासनाने हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असला तरी गुरुवारी काही तरुणांनी या देवस्थानच्या गाभाऱ्यात आरती करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी उपस्थित इतर समाजाच्या तरुणांनी आरती करण्याला विरोध केला. यामुळे दोन गटात शाब्दिक खडाजंगी होऊन धक्काबुक्की झाली. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सुनील पाटील, तहसीलदार उद्धव नाईक, शेवगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, पाथर्डीचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी घटनास्थळी येऊन दोन्ही गटाला शांतता राखण्याचे आवाहन करत दोन्ही गटाच्या भूमिका आणि भावना समजून घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र सायंकाळपर्यंत दोन्ही गट आपापल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने प्रशासनाला वाद मिटवण्यात यश आले नाही. पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील यांनी दोन दिवसांनी पाथर्डीला दोन्ही प्रमुख गटाची बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे म्हणत सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले. कान्होबादेव येथे झालेल्या बैठकीला सरपंच चारुदत्त वाघ,माजी सरपंच अमोल वाघ, अॅड. वैभव आंधळे, अमोल गवळी, तुषार वाघ, विष्णू घाटूळ, रघुनाथ लांघे, विकास वाघ, हरिचंद्र आव्हाड, राजेंद्र वाघ, संतोष कासार,अॅड. लतीफ शेख, शहाबुद्दीन शेख, मुस्ताक शेख, इसाक शेख, चांद सय्यद आदी उपस्थित होते. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे. कानिफनाथ देवस्थान परिसर तसेच जवखेडे खालसा या ठिकाणी या प्रकारामुळे तणावग्रस्त परिस्थिती आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/T1HoeEw
वाद सोडवण्यासाठी दोन्ही प्रमुख गटांची दाेन दिवसांनी पुन्हा बैठक:कान्होबा ऊर्फ तांबुळदेव येथे आरतीवरून वाद; शाब्दिक खडाजंगी अन् धक्काबुक्की
June 19, 2025
0