उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह (मनसे) सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बोगस मतदार याद्या आणि यादीतील घोळ सुधारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्यावर विरोधकांनी या बैठकीत एकमत दर्शवले. याद्या दुरुस्तीसाठी एक वर्ष लागले तरी हरकत नाही, अशीही ठाम भूमिका घेण्यात आली. सायंकाळी झालेल्या ईव्हीएम सादरीकरणात राज ठाकरे यांनी हीच भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करताना वर्षभरानंतरच निवडणुका घ्या, असे म्हटले. लोकांचा प्रचंड पाठिंबा असला तरी ईव्हीएममुळेच मनसे पराभूत झाली, असाही दावा त्यांनी केला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे गुरुवारी दुपारी विरोधक एकत्रित आले होते. राज ठाकरे यांच्या पुढाकाराने १ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या तयारीवर यात सखोल चर्चा झाली. जोपर्यंत दुबार मतदार आणि बोगस नावे मतदार याद्यांतून वगळली जात नाहीत आणि मतदार यादीतील घोळ राज्य निवडणूक आयोगाकडून दूर केला जात नाही तोपर्यंत निवडणुका न घेण्यावर विरोधक ठाम आहेत. राज्य निवडणूक आयोग जरी टप्प्याटप्प्याने कार्यक्रम जाहीर करत असला तरी मतदार याद्या सुधारल्याशिवाय विरोधक निवडणुकांना विरोध करत राहतील, अशी भूमिका आजच्या बैठकीतून घेण्यात आली. १ नोव्हेंबरच्या मोर्चानंतर या विरोधात उद्धवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व इतर पक्ष एकत्र येऊन अधिक तीव्रतेने भूमिका जाहीर करतील. मोर्चाच्या दिवशी सर्व पक्षाचे महत्त्वाचे नेते पुढील दिशा स्पष्ट करतील, असे सांगण्यात आले. सत्तेसाठी व्याकूळ झालेला मोर्चा; भाजपची टीका भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, सातत्याने असत्याची कास धरणाऱ्यांना सत्याची आठवण व्हायला लागली आहे. नौटंकी राजकारण होताना दिसत आहे. शरद पवारही मोर्चात येणार आमदार अनिल परब यांनी मोर्चाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही १ तारखेला सत्याचा मोर्चा काढत आहोत, जेणेकरून सत्य लोकांपर्यंत पोहोचावे. दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीटपासून मोर्चाला सुरुवात होईल आणि मेट्रो सिनेमामार्गे महापालिका गेटपर्यंत तो जाईल. शरद पवार या मोर्चाला उपस्थित राहणार असून आयोगाकडे केलेल्या मागण्यांबद्दल मोर्चात बोलणार असल्याचे परब यांनी सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/edwEbUD
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वर्षभराने घ्या, विरोधकांची भूमिका:मतदार यादी दुरुस्तीला एक वर्ष लागले तरी चालेल- राज ठाकरे
October 30, 2025
0