Type Here to Get Search Results !

नांदगाव तहसीलसमोर बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा:किसान सभेचा पुढाकार, कर्जमाफीचा लढा तीव्र करण्याचा निर्धार

संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूर येथे 'महाएल्गार' आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नांदगाव खंडेश्वर येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी किसान सभेच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक देत निदर्शने केली. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. संयुक्त किसान मोर्चाने केलेल्या मागण्या मान्य करण्याचा आग्रह यावेळी धरण्यात आला. निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन त्वरित पूर्ण करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. भविष्यात कर्जमाफीचा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कापसाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्चही निघणे दुरापास्त झाले आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे अनुदान देण्याची घोषणा हवेत विरली असून, अद्याप अनेक शेतकऱ्यांना एक दमडीही मिळालेली नाही. गेल्या तीन दिवसांपासून बच्चू कडू, किसान सभेचे कॉ. राजन क्षीरसागर, कॉ. अजित नवले आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात नागपुरात शेतकऱ्यांचे महाएल्गार आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार न्यायालयाच्या आडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ही पद्धत लोकशाहीची कबर खोदणारी असून, किसान सभेने सरकारच्या या दडपशाहीचा निषेध केला. ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेला शेतमाल कवडीमोल भावाने विकण्याची वेळ आली आहे. घोषणा करूनही नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र आणि सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. सरकारचे हे धोरण अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनात किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य सुनील मेटकर, तालुकाध्यक्ष हरिदास राजगिरे, तालुका सचिव विनोद तरेकर, संतोष सुरजुसे, बाजार समिती संचालक ओमप्रकाश सावळे, हरिदास देशमुख, विजय मंडवधरे, योगेश अवझाडे, निळकंठ ढोके, ओंकार ढोके, मंगेश जिरापुरे, वासुदेव चौधरी, बाबाराव इंगळे, सुहास चौधरी, लिलेश्वर आगळे, उमेश मंदुरकर, राजकुमार ठाकरे, गजानन गंधे, मुरलीधर वैदय, कृष्णाजी नंदेश्वर, वासुदेवराव ढोके, पंकज जवळकार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/IeLv8oc

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.