Type Here to Get Search Results !

बांगलादेशात कांदा शंभरीपार; निर्यातीसाठी सरकारला साकडे:भारतीय उत्पादकांची केंद्राकडे पाठपुरावा करण्याची मागणी

कांद्याचे भाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारताकडून प्रमुख आयात करणाऱ्या बांगलादेशमध्ये कांद्याचे घाऊक बाजारभाव तब्बल शंभर रुपये प्रति किलोच्या घरात पोहोचले असून, तेथील ग्राहकांना महाग दराने कांदा खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे लासलगाव येथील कांदा उत्पादक व निर्यातदारांनी केंद्र सरकारकडे बांगलादेशने आयातबंदी हटविण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. बांगलादेशने भारतातून आयात पुन्हा सुरू केली, तर शेतकऱ्यांना किमान दोन-पाच रुपये प्रति किलो दरवाढ मिळू शकते. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि बाजारातील स्थैर्य पुन्हा प्रस्थापित होईल. कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत सध्या कांद्याला १३ ते १७ रुपये प्रति किलो दर मिळत आहे. मात्र, याचवेळी बांगलादेशमध्ये दर शंभर रुपयांपर्यंत पोहोचल्याने दोन्ही देशांतील भावांमध्ये तब्बल सहापट फरक निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याने असंतोष व्यक्त होत आहे. लासलगाव येथील कांदा निर्यातदार व्यापारी व लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी संचालक प्रवीण कदम यांनी सांगितले की, बांगलादेशने कांद्यावरील आयातबंदी एक वर्षापासून कायम ठेवली आहे. त्यामुळे भारतीयांना निर्यातीची संधी मिळत नाही. दर स्थिर रहात नाहीत. केंद्राने तातडीने बांगलादेश सरकारशी समन्वय साधून आयातबंदी हटविण्यासाठी प्रयत्न करावेत. केंद्राच्या निर्णयाकडे लक्ष बांगलादेशातील कांद्याच्या वाढत्या किमती आणि भारतीय शेतकऱ्यांच्या अपेक्षा यामध्ये संतुलन साधण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी लासलगाव येथील कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांनी केल्याने शेतकऱ्यांसह व्यापारीवर्गही केंद्र सरकारच्या निर्णयाकडे उत्सुकतेने पहात आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/jhsF0ro

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.