Type Here to Get Search Results !

'घाटी'त घोटाळा:संभाजीनगरमध्ये डेंटिस्टच्या प्राध्यापकपदी अर्ज न केलेल्या डॉक्टरची थेट निवड; पात्र उमेदवारांना डावलले

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती अतिशय अफलातून झाल्याची सुरस कथा समोर आलीय. या सुपरफास्ट भरतीने मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांनीही चक्क तोंडात बोट घातलेत. या जागांच्या भरतीसाठी उमेदवारांचे अर्ज मागवले, त्यांची यादी जाहीर केली. पात्र नसलेल्यांच्या नावापुढे तसा स्पष्ट उल्लेख केला. मात्र, चक्क अर्ज न केलेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावून त्याची थेट निवडही केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 'घाटी'तल्या कारभाराला हा आणखी एक कलंक लागल्याचे बोलले जात आहे. दिव्य मराठीने डिजिटलने या प्रकरणी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या डीन डॉ. एम. एस. इंदूरकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी फक्त भरतीच्या घोळाचा प्रश्न ऐकला आणि फोन ठेवून दिला. त्यावर कसलिही प्रतिक्रिया दिली नाही. नंतर संपर्क साधला असता प्रतिसादही दिला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी फोन उचलला नाही. वर्णी लागलेला प्राध्यापक निवड समितीतील एका सदस्याचा नातेवाईक असल्याची चर्चाय. चार डॉक्टर ठरले पात्र शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठीची जाहिरात २७ ऑक्टोबर २०२५ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली. त्यात मुखशल्य चिकित्सशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापकपदाची एक जागा, तर सामाजिक दंतशास्त्र पदाच्या दोन जागा होत्या. त्या कंत्राटी पद्धतीने ३६४ दिवसांसाठी भरणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी अर्ज करायची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२५ होती. याची १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सात उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानुसार डॉ. श्रुती पुंडकर, डॉ. कुणाल देशमुख, डॉ. पल्लवी दिवेकर, डॉ. नेहा शेंडे यांना पात्र ठरवत मुलाखतीला बोलावले, तर डॉ. मनीषा राठोड, डॉ. नम्रता राठोड, डॉ. आनंद गायकवाड यांना अपात्र ठरवले. विशेष म्हणजे याची यादी निवड समितीने संकेतस्थळावर टाकली. त्यात ४ उमेदवारांसमोर मुलाखतीसाठी पात्र, तर ३ उमेदवारांच्या समोर मुलाखतीसाठी अपात्र असे स्पष्ट लिहिण्यात आले. चार पात्र उमेदवार १) डॉ. श्रुती राजेंद्र पुंडकर २) डॉ. कुणाल शंकरराव देशमुख ३) डॉ. पल्लवी गोरखनाथ दिवेकर ४) डॉ. नेहा अशोक शेंडे तीन अपात्र उमेदवार ५) डॉ. मनीषा दिगंबरराव राठोड ६) डॉ. नम्रता पंडित राठोड ७) डॉ. आनंद पंडित गायकवाड मेरिट लिस्टमध्येही घोळ मुलाखतीसाठी पात्र ४ डॉक्टरांनाच बोलावणे अपेक्षित होते. मात्र, १३ नोव्हेंबर रोजी या पात्र डॉक्टरांसोबतच या पूर्ण प्रक्रियेत साधा अर्जही न केलेल्या डॉ. मेहुल शहा यांना सुद्धा बोलावण्यात आले. विशेष म्हणजे त्यांना या मुलाखतीत सर्वाधिक ६८ गुण देत थेट सहाय्यक प्राध्यापकपदी निवडही केली. त्याची अंतिम निवड यादी २० नोव्हेंबर रोजी जाहीर केली. मात्र, या यादीत डॉ. मेहुल शहांना दुसऱ्या स्थानी ठेवले, तर पहिल्या स्थानी कमी ६४ गुण मिळवणाऱ्या डॉ. श्रुती पुंडकर यांचे नाव टाकले. रितसर अर्ज करून मुलाखत देणाऱ्या डॉ. पल्लवी दिवेकर यांना ६० आणि डॉ. नेहा शेंडे यांना ५० गुण देत वेटिंग लिस्टवर ठेवले. निवड समितीत कोण? अंतिम निवड यादीवर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या डीन डॉ. एम. एस. इंदूरकर यांची सही व शिक्का पाहायला मिळतो. या निवड समितीच्या अध्यक्ष डॉ. प्रज्ञा बनसोडे होत्या. तर डॉ. एम. एस. इंदूरकर, डॉ. जगदीशचंद्र वठार, डॉ. कांचन शहा, डॉ. स्मिता खालीकर, डॉ. राकेश मोहोडे आणि डॉ. अशोककुमार बन्साळी यांच्या समितीने ही निवड केली. अर्ज न करता थेट प्राध्यापक झालेला डॉक्टर हा निवड समितीतील एकाचा नातेवाईक असल्याची चर्चाय.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/twvSYWy

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.