Type Here to Get Search Results !

विघ्नहर पतसंस्थेने 50 ठेवीदारांचे 5 कोटी बुडवले, गुन्हा दाखल:1 कोटी बुडवल्याची तक्रार दाखल; संचालकांविरुद्ध तपास सुरू

विघ्नहर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने जास्त व्याजाच्या आमिषाने ठेवीदाराची १ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या पतसंस्थेने छत्रपती संभाजीनगरमधील ५० हून अधिक नागरिकांची ५ कोटींची फसवणूक केल्याची शक्यता प्राथमिक तपासात समोर येत आहे. या ठेवीदारांनी ३ महिन्यांपूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. संचालक मंडळाने ठेवीदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला, असे ठेवीदार व तक्रारदार तौफिक शेख यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. फिर्यादी शेख तौफिक मोहंमद शफी (रा. टाइम्स कॉलनी, कटकट गेट, छत्रपती संभाजीनगर) हे भुसा तयार करतात. विघ्नहर मल्टिस्टेट सोसायटीत एक वर्षासाठी ठेवी ठेवल्यास १०% ते १२% व्याजाचा परतावा मिळतो, असे शफी यांना संस्थेचे मुख्य सल्लागार मथुरादास देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे तौफिक यांनी १० मे २०२३ पासून टप्प्याटप्प्याने संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर शाखेत एकूण १ कोटी ५ हजार ५०० जमा केले. पैसे मागताच टाळाटाळ तौफिक शेख व इतर ठेवीदार १ जून २०२५ रोजी संस्थेच्या उल्कानगरीतील कार्यालयात गेले. यावेळी मॅनेजरने देशमुख यांना कॅन्सर झाल्याने उपचार सुरू असल्याचे सांगितले. नंतर ठेवीदारांनी वारंवार संचालक डॉ. क्याटमवार, वीरसिंहजी आणि आर. जी. बाहेती यांच्याशी संपर्क साधूनही पैसे देण्यास टाळाटाळ केली. संचालकांची मालमत्ता जप्त करणे शक्य एका कोटीहून अधिक रकमेची फसवणूक असल्याने हे प्रकरण केवळ भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३१८ (फसवणूक) आणि ३१६(गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात) एवढेच नव्हे, तर ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण अधिनियम अंतर्गत कलमे लागू केली आहेत. यामुळे संचालकांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना पैसे परत करणे शक्य.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/cvbnl8P

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.