Type Here to Get Search Results !

प्रगतिशील शेतकरी:थंड हवामानात होणारी स्ट्रॉबेरी शेती फुलंब्रीत फुलवली; स्थानिक पातळीवरच 400 रुपये किलो दराने विक्री, वाहतूक खर्च नाही

फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील दोन तरुण शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. महाबळेश्वरसारख्या थंड हवामानाच्या भागात होणारे हे पीक आता फुलंब्रीतही फुलले आहे. समाधान बलांडे आणि योगेश बलांडे या दोघा तरुण शेतकऱ्यांनी प्रत्येकी पाच गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. सध्या रोज दहा किलो स्ट्रॉबेरी मिळत असून, ४०० रुपये किलोप्रमाणे दोघांना प्रत्येकी २ हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. पुढील चार महिने हे पीक चालणार आहे. तालुक्यात स्ट्रॉबेरीची लागवड नसल्याने ताजी स्ट्रॉबेरी खरेदीसाठी जिल्ह्यातून ग्राहक फोनवर ऑर्डर देत आहेत. समाधान बलांडे यांच्याशी संपर्क साधून थेट ग्राहक त्यांच्याकडून माल घेत आहेत. शेतीतील तोट्यांवर मात करत या तरुणांनी नवा मार्ग दाखवला आहे. स्थानिक पातळीवरच माल विकला जात असल्याने त्यांचा वाहतूक खर्च वाचला. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य झाले. आगामी काळात स्ट्रॅबेरीचे क्षेत्र वाढवण्याचा दोन्ही शेतकऱ्यांचा मानस आहे. महाबळेश्वरहून आणली रोपे महाबळेश्वरहून त्यांनी दहा रुपये प्रतिरोप दराने पाच हजार रोपे विकत घेतली. लागवडीसाठी ५० हजार रुपये खर्च आला. चार फूट रुंदीचे बेड तयार करून एक फूट अंतरावर रोपे लावली. लागवडीनंतर दोन महिन्यांत उत्पादन सुरू झाले. रोज सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान स्ट्रॉबेरी तोडून अर्धा किलो व एक किलोचे बॉक्स तयार केले जातात. हे बॉक्स ४०० रुपये दराने विकले जात आहेत. अल्पावधीत मिळते उत्पन्न स्ट्रॉबेरीची लागवड केल्यानंतर फार काळ देखभाल करावी लागत नाही. हे पिक लागवडीनंतर केवळ दोनच महिन्यात उत्पादन निघायला सुरूवात होते. सिंचन, खतांची योग्य मात्रा देऊन वेळोवेळी आवश्यक फवारणी करावी लागते. सिल्व्हर ब्लॅक मल्चिंगचा वापर थंड हवामान नसतानाही स्ट्रॉबेरीचे पीक टिकवण्यासाठी समाधान बलांडे यांनी विशेष तंत्रज्ञान वापरले. काळ्या मल्चिंगऐवजी सिल्व्हर ब्लॅक मल्चिंग पेपर वापरला. यामुळे सूर्यप्रकाश परावर्तित होऊन उष्णता कमी झाली. रोपांच्या खाली बारीक कुट्टीचा चारा अंथरून मातीला थंडावा दिला. ठिबक सिंचन आणि सेंद्रिय खतांचा वापर करून पाने सुकून काळे पडणे आणि पिवळेपणा येणे असे प्रकार टाळले. शेतकरी समाधान बलांडे यांचा मोबाईल क्र. - 8999082526

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/7bkCSJ2

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.