Type Here to Get Search Results !

मोक्षदा एकादशीला पंढरीत विठ्ठलाचे दीड लाख भाविकांकडून दर्शन:मार्गशीर्ष महिन्यात श्री विठ्ठलाचे विष्णुपदावर वास्तव्य

मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशीनिमित्त सोमवारी एकादशीला दीड लाखाहून अधिक भाविकांनी पंढरीत गर्दी केली होती. त्याचबरोबर विष्णुपद दर्शनासाठी गोपाळपूर येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी सुमारे पाच तासांचा वेळ लागत होता. तीन क्रमांकाच्या पत्राशेडपर्यंत दर्शनरांग पोहोचली होती. सोमवारी मोक्षदा एकादशी होती, यानिमित्त सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागातून वारकरी पंढरीत दाखल झाले होते. श्री विठ्ठलाचे दर्शन केल्यानंतर भाविकांनी विष्णुपद येथेही दर्शनासाठी गर्दी केली होती. मार्गशीर्ष महिन्यात श्री विठ्ठलाचे वास्तव्य गोपाळपूर हद्दीतील भीमा नदीत असलेल्या विष्णुपदावर असते अशी भाविक भक्तांची धारणा आहे. त्यामुळे या महिनाभर भाविक विष्णुपद येथे जातात. तसेच येथे दर्शनानंतर भाविक स्नेहभोजन करताना दिसून येत होते. मंदिर समितीने भाविकांना येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने भाविकांना विष्णुपद दर्शन सुलक्ष झाल्याचे चित्र दिसून आले. गोपाळपूर येथे २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान विष्णुपद उत्सव होत आहे. या उत्सवास २० डिसेंबरपासून सुरवात झाली आहे. या ठिकाणी दर्शनरांगेसाठी बॅरिकेडिंग, सुरक्षा व्यवस्थेकामी कमांडोज, पिण्याच्या पाण्याची सोय, चांगली स्वच्छता व्यवस्था, अभिषेक पूजा भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विठ्ठलाने सवंगड्यांसह भोजन केल्याची आख्यायिका चंद्रभागा नदीवरील विष्णुपद मंदिर येथे एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहुडाचरण पावले उमटलेली आहेत. त्यासोबत काठी ठेवल्याची आणि काल्याच्या वाडग्याची खूण दिसते. या शिळेवर दगडी मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपाच्या खांबावर चतुर्भुज समचरण विष्णुमूर्ती आणि देहुडाचरण मुरलीधराची मूर्ती कोरण्यात आली आहे. विठ्ठलाने आपल्या सवंगड्यासह भोजन केल्याचे सांगितले जाते. तेव्हा येथे देवाची आणि गायीची पावले उमटली. विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्याने इथे उमटलेल्या पावलांमुळे या ठिकाणाला विष्णुपद असे नाव मिळाले आहे. स्वच्छतेसाठी जादा कर्मचारी नियुक्त या ठिकाणी वनभोजनाची प्रथा असल्याने स्वच्छतेसाठी जादा कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पंढरपूर नगर परिषद प्रशासन व पोलिस प्रशासन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत. येथे येणाऱ्या सर्व भाविकांना मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊन तेथील सर्व प्रथा व परंपरेचे पालन करण्याची दक्षता मंदिर समितीने घेतल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या वेळी सांगितले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/mRp0yA6

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.