राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती. या खळबळजनक खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले कुख्यात बंडू आंदेकर, त्याची भावजय आणि माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, तसेच वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर यांना पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष 'मकोका' न्यायालयाने या आरोपींना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी यासंदर्भात निकाल देताना स्पष्ट केले की, निवडणूक लढवणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे आणि त्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही. न्यायालयाने पुढे नमूद केले की, आरोपींना निवडणूक लढवण्यासाठी कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही. तसेच, निवडणूक नामांकनाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्ताची मागणी आरोपी करू शकतात, ज्यावर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. आंदेकर कुटुंबाचा अर्ज आणि युक्तिवाद बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय 70), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय 60) आणि सोनाली वनराज आंदेकर (वय 36) यांनी अॅड. मिथुन चव्हाण यांच्यामार्फत आगामी पुणे महापालिका निवडणूक लढवण्याची परवानगी मागण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार आरोपींना निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद अॅड. चव्हाण यांनी केला, जो न्यायालयाने ग्राह्य धरला. खून प्रकरणाची पार्श्वभूमी बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्यातील टोळीयुद्धातून गेल्या वर्षी वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या खूनाचा बदला म्हणून, या प्रकरणात आरोपी असलेल्या गणेश कोमकरचा मुलगा आयुष याची 5 सप्टेंबर रोजी, गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती, असे पोलिस तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात आंदेकर कुटुंबातील तिघांसह एकूण 15 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/wYjU8Nv
आंदेकर कुटुंबाचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा:आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपींना न्यायालयाचा दिलासा
December 10, 2025
0