कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. येथील महावीरनगर परिसरात एका नराधम मुलाने आपल्या वृद्ध आई-वडिलांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. विजयमाला नारायण भोसले (७०) आणि नारायण गणपतराव भोसले (७८) अशी मृतांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आईच्या हाताची नस कापली, नंतर वडिलांच्या डोक्यात वार मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सुनील नारायण भोसले (४८) याने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हे कृत्य केले. त्याने अत्यंत थंड डोक्याने आई विजयमाला यांच्या हाताची नस धारदार वस्तूने कापली आणि त्यांच्या चेहऱ्यावर काचेच्या तुकड्याने भीषण वार केले. त्यानंतर वडील नारायण भोसले यांच्या डोक्यात काठीने जोरदार प्रहार केले. या जीवघेण्या हल्ल्यात वृद्ध दंपत्याचा जागीच मृत्यू झाला. स्वतःहून दिली गुन्ह्याची कबुली खून केल्यानंतर संशयित आरोपी सुनील भोसले हा रक्ताळलेल्या अवस्थेत स्वतःहून हुपरी पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने आपणच आई-वडिलांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली तेव्हा पोलिसही अवाक झाले. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिस तपास व फॉरेन्सिक टीम दाखल घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक एन. आर. चौखंडे, सहायक निरीक्षक विक्रम शिंदे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. घराची पाहणी केली असता दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होते. संशयित मुलगा मानसिक तणावात ? पोटच्या मुलाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हा खून कौटुंबिक वादातून झाला की सुनीलचा काही मानसिक तणाव होता याचा तपास पोलिस करत आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/HZ8fAEq
हुपरीमध्ये मुलानेच केला वृद्ध आई-वडिलांचा खून:नंतर पोलिसांत हजर, कोल्हापूर जिल्हा हादरला, हत्येचे कारण अजूनही अस्पष्ट
December 19, 2025
0