जिल्हा परिषदेच्या सालोरा येथील पूर्व माध्यमिक शाळेला भेट दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी काही काळासाठी शिक्षिकेची भूमिका बजावली. यावेळी प्रश्नोत्तरांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट सहभाग पाहून त्या अत्यंत आनंदी झाल्या. तिवसा तालुक्यातील सालोरा शाळेचे शैक्षणिक व सहशैक्षणिक कामकाज, शिस्तबद्ध वातावरण तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व आत्मविश्वासपूर्ण प्रतिसाद पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी अत्यंत प्रभावित झाल्या. शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच कौशल्य, सर्जनशीलता आणि मूल्याधारित शिक्षणाची जोपासना होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले उपक्रम, प्रश्नोत्तरांमधील त्यांचा सहभाग, स्वच्छ व नीटनेटका शाळा परिसर, शिक्षकांचे नियोजनबद्ध अध्यापन व व्यवस्थापन यामुळे शाळेची गुणवत्ता अधोरेखित झाली. यावेळी तिवसा येथील गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे, सहायक गटविकास अधिकारी नारायण आमझरे, गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे, विस्तार अधिकारी राठोड व उलेमाल उपस्थित होते. सालोरा बुद्रुक शाळेचा हा गौरव संपूर्ण शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत डॉ. नितीन उंडे यांनी व्यक्त केले. या भेटीदरम्यान सीईओ संजीता महापात्र यांनी विद्यार्थ्यांसोबत भोजनही केले. शिक्षकवृंदाची मेहनत, विद्यार्थ्यांशी असलेले आपुलकीचे नाते व पालकांचा सकारात्मक सहभाग यामुळेच शाळेने ही उंची गाठली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सीईओंनी शाळेच्या कार्याचे मनापासून कौतुक करून विद्यार्थ्यांना पुस्तके व शालेय उपयोगी वस्तू भेट दिल्या. तसेच भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/SP8k71X
सीईओ संजीता महापात्र सालोरा शाळेत शिक्षिका बनल्या:विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्रतिसादाने प्रभावित होऊन आनंद व्यक्त केला
December 18, 2025
0