महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शुक्रवार, २६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, अंतिम फेरीतील महाविजेता संघ रविवार, २८ जानेवारी रोजी निश्चित होईल. पुणे, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि कोल्हापूर येथील केंद्रांवर झालेल्या स्पर्धांमधून निवडलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका या महाअंतिम फेरीत सहभागी झाल्या आहेत. २६ आणि २७ जानेवारी रोजी सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांत स्पर्धा पार पडेल, तर २८ जानेवारी रोजी सकाळी अंतिम सत्र होईल. स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठीचे लॉट्स २५ जानेवारी रोजी काढण्यात आले. शुक्रवार, २६ जानेवारी रोजी सादर झालेल्या एकांकिकांमध्ये सकाळी ९ वाजता अमरावती येथील विद्याभारती महाविद्यालयाचे 'लगीन', नागठाणे येथील आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजचे 'सोयरिक' आणि अमरावती येथील श्री ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचे 'स्वधर्म' यांचा समावेश होता. सायंकाळी ५ वाजता हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे 'काही प्रॉब्लेम ये का' आणि गणेशखिंड येथील मॉडर्न कला-विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे 'वामन आख्यान' सादर झाले. शनिवार, २७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाची 'अस्तित्व', बडनेरा येथील प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्चची 'अर्बन' आणि कोल्हापूर येथील दे. भ. रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सची 'ग्वाही' या एकांकिका सादर होतील. सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभागाचे 'खोडाला फांदीचा आधार', रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाचे 'जाळ्यातील खिळे', फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरीचे 'ठोंग्या', नागपूर येथील वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेचे 'गोष्टीचा खेळ' आणि छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे 'बुजगावणं' सादर केले जातील. रविवार, २८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता रत्नागिरी येथील फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजीची 'तुकारामाची टोपी', छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय नाट्यशास्त्र विभागाचे 'वयाचं गणित', छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 'जिव्हाळा' आणि पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालय (स्वायत्त) ची 'आतल्या गाठी' या एकांकिका सादर होतील. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/p9diCB3
पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरी आजपासून सुरू:पुणे, रत्नागिरी, संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर केंद्रांवरील विजेते स्पर्धेत
December 25, 2025
0