आपण पाणी मागितले, रस्ते मागितले हे सोडून ते भलते काही बोलतील, कामाचे काही बोलणार नाहीत. हे म्हणतील मेट्रो देतो, यांना सांगा, पाणी द्या मग बाकीचे बोला, हे लोक फक्त लुटालूट करतात, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौक ते गुलमंडी येथे भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. आदित्य ठाकरे यांनी शहरातील संस्थान गणपतीला नारळ फोडून महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ केला. संस्थान गणपती हे संभाजीनगर शहराचे ग्रामदैवत आहे. बाळासाहेब ठाकरे देखील संस्थान गणपतीला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करायचे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी गुलमंडी येथे कारच्या बोनेटवर उभे राहून भाषण केले. आदित्य ठाकरे म्हणाले, हे सरकार आपल्याला परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी मोर्चा काढला, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला. पालकमंत्र्यांचे व्हिडिओ येतात, पैसे दिसतात, हे पैसे कुठून येतात? असा सवाल त्यांनी केला. तसेच ते म्हणाले, इथल्या खासदाराची कसली दुकाने आहेत? बॅगमधील पैसा निवडणुकीत बाहेर येईल, त्याला हात लावू नका, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी जनतेला केले. तसेच ठाकरेंच्या युतीवर बोलताना ते म्हणाले, मुंबईत आपण एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत. सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, हे लोक फक्त लुटालूट करतात. हे वसुलीबाज, हफ्तेबाज आहेत. ती शिवसेना नाही ती मिंधे चिंधी चोर टोळी आहे. कोणी तरी आपल्यात प्रवेश केला म्हणून टीका करतात, पालघरमधील साधू हत्याकांड बाबत प्रमुख आरोपी भाजपमध्ये का घेतला? ते आधी सांगा, मग आम्हाला प्रश्न विचारा असे आव्हान त्यांनी दिले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/u0geMCm
संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंची तोफ धडाडली:कारच्या बोनेटवर उभे राहून जोरदार भाषण, संस्थान गणपतीला नारळ फोडून फुंकले प्रचाराचे रणशिंग
December 26, 2025
0