राज्यातील २९ मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. असे असतानाही काही मनपासाठी महायुतीतील फाटाफुट चव्हाट्यावर आले तर काही ठिकाणी जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अशातच सोलापुरात सोलापुरात जागावाटपाची चर्चा ऐनवेळी थांबवून एकनाथ शिंदेंची शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला बाजुला सारून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्येही या दोन्ही पक्षांच्या भूमिकेमुळे महायुतीची शक्यता धूसर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, अमरावती, मीरा भाईंदरमध्येही शिंदे गट-भाजप युतीबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असून हा तिढा निर्णायक वळणावर आलेला आहे. अजित गटाने पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या पक्षासोबत युती जाहीर केली. त्यांचा पक्ष मुंबई व पुण्यासोबत छत्रपती संभाजीनगरमध्येही स्वबळावर लढत आहे. संभाजीनगरमध्ये शिंदेगट व भाजपमध्ये युतीसाठी चर्चा सुरूच आहे. संबधित. दिव्य सिटी सोलापुरात शिंदे गट-अजित गटाचे जागावाटपही ठरले... सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने सन्मानजनक जागा न दिल्याने शिंदेंच्या शिवसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेत भाजपला धक्का दिला. शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. दोन्ही पक्षांचा ५१-५१ जागावाटपाचा फॉर्म्युलाही त्यांनी जाहीर केला. नाशिक : शिवसेना-राष्ट्रवादी युती शक्य नाशिकमध्ये भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद दिला जात नसल्याने शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची स्वतंत्र युती निश्चित मानली जात आहे. रविवारी रात्री शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. शिवसेनेने भाजपकडे ४५ जागा जिंकण्यासारख्या असल्याने त्यांची मागणी केली. त्यावर भाजपकडून केवळ ३० जागांच देण्याची तयारी केल्याने नाराजी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने २५ जागांची मागणी केलेली असताना केवळ ५ जागा देण्याची तयारी दर्शवल्याने त्यांनीही काढता पाय घेतला आहे. मुंबई : भाजप-शिंदे गट २० जागांचा तिढा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीमध्ये एकूण २२७ जागांपैकी २०७ जागांवर एकमत झाले आहे. यामध्ये भाजपने १२८ जागा स्वतःच्या वाट्याला ठेवल्या, तर शिंदे गटाला ७९ जागा देऊ केल्या. उर्वरित २० जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. ठाकरेंच्या आघाडीपुढे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी किमान ८७ जागा मिळाव्यात म्हणून शिंदे गट सुरुवातीपासून आग्रही आहे. महायुतीतील पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी येथे स्वबळावर लढत भाजप युतीला आव्हान देत आहे. ठाणे, वसई-विरारमध्ये युती, पण मीरा-भाईंदरमध्ये पेच... ठाणे आणि वसई-विरारमध्ये महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आहे. त्याच वेळी मीरा-भाईंदरमध्ये मात्र शिंदे गट आणि भाजपमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी युतीसाठी भाजपला ‘२४ तासांचा अल्टिमेटम’ देत निर्णय न झाल्यास आमचा पक्ष सर्व ९५ जागा स्वतंत्र लढायला तयार असल्याचे म्हटले आहे. नगरपालिका व पंचायत निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत महायुतीत आपणच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे महापालिकेतील जागावाटपातही भाजपने आपला दबादबा सुरुवातीपासून ठेवला. तिथे जागावाटप झाले तिथेही पूर्ण जागांचे गणित अद्याप स्पष्ट नाही. कारण काही जागांवर आपलाच उमेदवार निवडणूक आणण्याचा विश्वास किंवा जास्त जागा जिंकत महापालिकेतील बहुमताजवळचा आकडा मिळवण्याचा पवित्रा भाजपने घेतल्याचे एकूण परिस्थितीवरून स्पष्ट होते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/wPovIt0
संभाजीनगर, नाशकात घोळ सुरूच; सोलापुरात शिंदे-अजित गट एकत्र:उमेदवारी अर्जासाठी दाेनच दिवस शिल्लक, तरीही युतीत संभ्रम
December 28, 2025
0