Type Here to Get Search Results !

बहुतेक नगरपालिकांच्या पहिल्या बैठका १३ जानेवारीला:चिखलदरा 12, वरुड 14, तर अचलपूरची सभा 15 जानेवारीला

जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. यानंतर उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यापासून २५ दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे बहुतेक नगरपालिकांनी १३ जानेवारी रोजी पहिल्या बैठकीचा मुहूर्त साधला आहे. या बैठकांमध्ये चिखलदरा नगरपालिकेत १२ जानेवारीला, वरुड नगरपालिकेत १४ जानेवारीला, तर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ४१ सदस्यीय अचलपूर नगरपालिकेत १५ जानेवारी रोजी पहिली सभा होणार आहे. चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, धारणी, धामणगाव रेल्वे, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर आणि शेंदुरजना घाट येथील सभा १३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. अंजनगाव सुर्जी येथील सभेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. नगरपालिकांची पहिली सभा ही सभागृहातील सदस्य आणि नगराध्यक्ष यांच्या कार्यकाळाची सुरुवात असते, त्यामुळे तिला विशेष महत्त्व आहे. याच सभेत स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्याची संधी असल्याने राजकीयदृष्ट्याही या बैठकींबाबत उत्सुकता आहे. सर्व सभांचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष भूषवणार असून, त्यांच्याच स्वाक्षरीने सभेच्या नोटीस काढण्यात आल्या आहेत. दरम्यान, दर्यापूर नगरपालिकेची पहिली सभा ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त डॉ. विकास खंडारे हे या नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत. त्यांच्या देखरेखीखाली आणि नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडेल. पहिल्या सभेत उपाध्यक्षांसोबतच स्वीकृत सदस्यांचीही निवड केली जाते. उपाध्यक्षांची निवड बहुमतावर आधारित असल्याने ज्या पक्षाकडे बहुमत आहे, तेथे ही निवड सहज होईल. मात्र, स्वीकृत सदस्यांची निवड संख्याबळानुसार केली जाते. यासाठी अनेक नगरपालिकांमधील अपक्षांना सोबत घेऊन पक्षीय नगरसेवकांनी गट तयार केले आहेत आणि त्यांना जिल्हाधिकाऱ्यांची मान्यताही मिळवली आहे. अशा प्रकारे स्वतःच्या पक्षाचे संख्याबळ वाढवून स्वीकृत सदस्य निवडून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या या गटांबाबत कमालीची गोपनीयता राखली जात आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/aPFwAbk

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.