'आम्हाला शुद्ध पाणी काय असतं माहित नाही. घंटागाडीवाले कचरा उचलायचे पैसे घेतात. आमच्या मुलांना अंगणवाडीत सुद्धा येऊ देत नाहीत.' हे दुसरं-तिसरं कुठलंही नसून आपल्या स्मार्ट सिटी म्हणून गौरव होणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रभाग क्रमांक 11 मधलं वास्तव आहे. दिव्य मराठी ॲपच्या 'लढाई मनपाची मुद्दा नागरिकांचा' या टॉक शोमध्ये स्थानिकांनी आपल्या समस्यांचा पाढाच वाचला. प्रभाग क्रमांक अकरामध्ये पाण्याची मोठी समस्या आहेच. सोबतच ड्रेनेज, कचऱ्याच्या समस्येनेही लोक हैराण झालेत. वाचा हा ग्राउंड रिपोर्ट... शुद्ध पाणी काय असतं? प्रभागातील नागरिकांशी संवाद साधताना कळले की, परिसरातील काही भागात अत्यंत दूषित पाणी येते. येथील रहिवासी शमा म्हणतात ,'आम्हाला सगळं ड्रेनेजचं पाणी येतं. त्याचा इतका वास येतो की, ते पिण्यालायक सुद्धा नसतं. ६ ते ८ दिवसांनी आमच्याकडे पाणी येतं. त्यातील एक तास पाणी रहातं आणि आर्धा तास घाण पाणी येतं. अर्ध्या घंट्यात आम्ही कसा पाण्याचा साठा करावा. ज्यांच्याकडं बोर असते त्यांच्याकडून आम्हाला पाणी आणावं लागतं. या दूषित पाण्याबद्दल अनेकदा तक्रार केली, पण कोणी त्यावर काहीच करायला तयार नाही. त्यामुळं स्वच्छ पाणी काय असत हे आम्हाला माहित नाही.' घंटा गाडीवाले येत नाहीत प्रभाग ११ मधील चिस्तीया कॉलनीतील रहिवासी परवीन बेगम म्हणतात की, 'घरात २-३ दिवसाचा कचरा साठलेला राहतो. मात्र घंटा गाडी येत नाही. रस्ते झाडायला सुद्धा महानगरपालिकावाले येत नाहीत. त्यांना म्हणलं तर म्हणतात की आमच्याकडे माणसं नाहीत. यांच्याकडे माणसं नाहीत तर यात आमचा काय दोष. शहराला साफ ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे घंटा गाडी जर आली नाही, तर आम्ही साठलेला कचरा रस्त्यावर आणून फेकू. आता हाच एक मार्ग आमच्याकडे आहे. अनेकदा फोन करून, तक्रार करून सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलं जात नसेल, तर आम्ही त्यावर एक पाऊल पुढे जाऊ.' अशा आक्रमक शब्दांमध्ये येथील नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. रस्त्याने पाणी तुंबते रहिवासी शगीला बानू म्हणतात की, 'रस्त्यानं अनेक चढ - उतार आहेत. त्यामुळं अनेक ठिकाणी पाणी तुंबते. त्यातच ड्रेनेजचे पाणी मिक्स होऊन इतकी दुर्गंधी होते की, आम्ही तो वास सहन करू शकत नाही. त्याच पाण्यात आमचे लेकरं खेळतात. लहान - लहान मुलं आमच्या गल्लीत आहेत. त्यांच्या आरोग्याचा आमच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण होतो. याच भागात 'एमजीएम' कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेली अनेक वर्ष झाले मोठा खड्डा तयार झाला आहे. त्यात पावसाचे, नळाचे पाणी साचते. बाजूलाच कचऱ्याचा ढिगारा असल्यामुळं तिथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. त्याचबरोबर पाणी सतत साचून असल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या आम्हाला उद्भवतात.' याच भागात राहणाऱ्या राबियाबी म्हणतात की, 'खूप दिवसानंतर पाणी सोडतात. तेही एक तास चालत. फुल्ल प्रेशरनं पाणी न सोडल्यामुळे पाणीच पुरत नाही. आमच्या एकाच गल्लीला नाही, तर इथल्या तीन गल्लीला याचा त्रास आहे. वरच्या भागात राहणारे लोक पाण्याच्या दिवशी रोड झाडून काढतात आणि आम्हाला तर पाणीच येत नाही. हा आमच्यासोबत अन्याय होतो. येणाऱ्या नगरसेवकाकडून हीच अपेक्षा आहे की, त्यांनी आमच्या समस्या दूर कराव्यात. जर त्यांनी आमचे काम केलं तरच आम्ही त्यांना निवडून देऊ. कचऱ्याची समस्या आमच्याकडे खूप मोठी आहे. घंटा गाडीवाले एक तर रोज येत नाहीत. आले तर गल्लीतला अर्धाच कचरा उचलतात. त्यांना काही म्हणलं तर म्हणतात की, पैसे द्या. नाहीतर उलट उत्तर देतात.' अंगणवाडीत येऊ देत नाहीत चिस्तीया चौकात राहणारे जावेद शेख म्हणतात की,'तीन ते साडे तीन हजार लोकसंख्येत केवळ एकच अंगणवाडी आहे. ती आमच्या तिसऱ्या गल्लीत आहे. आम्ही महिला बालविकास मध्ये अनेकदा तक्रार केली. पण त्यांनी काहीच उत्तर दिल नाही. अंगणवाडीत गेलं तर म्हणतात की, तुम्ही आमच्या भागात येत नाही. त्यामुळे तुम्हाला आम्ही घेऊ शकत नाहीत. तुम्ही हेड ऑफिसला जाऊन बोला. तिथे गेलो तर ते उत्तर देत नाहीत. आमच्या मुलांना खेळण्यासाठी परिसरात कुठलेच ग्राउंड नाही.' अशी आहे प्रभागाची रचना प्रभाग क्रमांक ११ मध्ये गणेश नगर, आविष्कार एन-6 कॉलनी, हत्तेसिंगपुरा, सिंहगड कॉलनी, शुभश्री कॉलनी, साईनगर, चिस्तीया कॉलनी, जिव्हेश्वर कॉलनी, वैशाली नगर, टेलिकॉम सोसायटी, आनंद बिल्डिंग यांचा समावेश होतो. प्रभागत एकूण 38979 लोक राहतात.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/4sCFvLT
लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:'शुद्ध पाणी काय असतं माहित नाही, घंटागाडीवाले कचरा उचलायचे पैसे घेतात, मुलांना अंगणवाडीत येऊ देत नाहीत,' संभाजीनगरमधलं हे सुद्धा वास्तव जाणून घ्याच...!
January 06, 2026
0