Type Here to Get Search Results !

विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळ्याची जय्यत तयारी:23 जानेवारीला परंपरेनुसार भाविकांच्या उपस्थितीत सोहळा

पंढरपूर येथे माघ शुद्ध १ ते ५ या कालावधीत संपन्न होणाऱ्या श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आली असून, वसंत पंचमी अर्थात २३ जानेवारी रोजी परंपरेनुसार विवाह सोहळा होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. यानिमित्ताने साध्वी अनुराधा (दिदी) राजेंद्र शेटे यांचे रूक्मिणी स्वयंवर कथेचे आयोजन दिनांक १९ ते २२ जानेवारी या कालावधीत दररोज दुपारी ४. ते ६. या वेळेत करण्यात आले आहे. वसंत पंचमी दिनी सकाळी १० ते १२ या वेळेत विठ्ठल रूक्मिणीमातेचा विवाह सोहळा विधिवत मंत्रोच्चारात संपन्न होणार आहे. पहाटे काकडा आरतीवेळी विठ्ठलास सोन्याच्या मुकुटाऐवजी मंदिरातील पांढरे पागोटे परिधान करण्यात येते. या दिवसापासून रंगपंचमीपर्यंत श्री विठ्ठलास पांढरा पोशाख परिधान केला जातो. यानिमित्त सकाळी ११ वाजता श्री विठ्ठलाची तुळशी पूजा करण्यात येईल. त्यानंतर श्री विठ्ठलास विवाह स्थळी येण्याचे निमंत्रण देण्यात येते. श्री रूक्मिणी मातेस पांढरा पोशाख व पारंपारिक अलंकार परिधान करून पाद्यपूजा, नैवेद्य व आरती होते. दुपारी १२ वाजता श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मूर्ती श्री विठ्ठल सभामंडपात आणून विवाह सोहळा विधीवत पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी ४.०० वाजता पोशाखानंतर पाद्यपूजा करण्यात येणार आहे. प्रतीकात्मक मूर्तींची सवाद्य शोभायात्रा काढण्यात येणार श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मूर्तींची सवाद्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सदर शोभायात्रा व्ही.आय.पी. गेट, श्री संत नामदेव पायरी, महाद्वार पोलीस चौकी, कालिका देवी मंदिर, काळा मारुती चौफाळा, नाथ चौक, तांबडा मारुती मंदिर, माहेश्वरी धर्मशाळा, महाद्वार पोलीस चौकी, पश्चिम द्वार, व्ही.आय.पी. गेट या मार्गाने निघणार आहे. भाविकांना हा सोहळा घरबसल्या पाहता येणार भाविकांना सोहळा पाहता यावा यासाठी चौफाळा व महाद्वार पोलीस चौकी येथे एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार असून, विविध समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना हा सोहळा घरबसल्या पाहता येणार आहे. तसेच वसंत पंचमीच्या दिवशी दुपारी १२.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत अन्नछत्र सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री. संदेश भोसले यांनी दिली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/QSdhJja

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.