Type Here to Get Search Results !

सातारा क्राइम:दुचाकीवरील टोळीने महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले, चेनस्नॅचर महिला असल्याने खळबळ

सातारा शहरातील सदरबझार परिसरात भरदिवसा झालेल्या चेनस्नॅचिंगच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरून आलेल्या तिघांच्या टोळीने एका महिलेच्या गळ्यातील तब्बल ९० हजार रुपये किंमतीचे २ तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या टोळीतील चेन हिसकावणारी व्यक्ती अज्ञात महिला असल्याने हा प्रकार अधिकच धक्कादायक ठरला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणी पूनम नानासाहेब मोहिते (वय ३९, रा. खेड, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दि. १७ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पूनम मोहिते या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या दुसऱ्या दुचाकीवरील तिघांपैकी एका महिलेने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून घेतले व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. अजंठा चौकात तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला सातारा शहरातील अजंठा चौक परिसरात दुचाकीवर कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हिंसक हाणामारीत झाले. या प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पंकज शिवाजी नावडकर (वय २३, रा. सोनगाव, ता. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. दि. १७ जानेवारी रोजी अजंठा चौकात दुचाकी कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून निखिल जगदीप पवार व पृथ्वीराज भिमराव साळुंखे (दोघे रा. अमरलक्ष्मी स्टॉप परिसर, सातारा) यांनी पंकज नावडकर यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच शिवीगाळ व धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. सातारा तालुक्यात बेकायदा दारूविक्रीवर कारवाई सातारा तालुक्यात अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. देगाव (ता. सातारा) येथे बेकायदा दारू विक्री करताना एका व्यक्तीस पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सुनील लक्षण माने (वय ३९, रा. देगाव, ता. सातारा) याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीकडून ९२० रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अवैध दारूविक्रीमुळे सामाजिक समस्या वाढत असून अशा कारवायांमुळे गावागावात पोलिसांची दहशत निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/iNTSEh6

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.