Type Here to Get Search Results !

पतीची बंडखोरी, माजी महापौर गेल्या माहेरी:भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी

पतीच्या बंडखोरीमुळे नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर माहेरी निघून गेल्या आहे. अर्चना डेहनकर यांचे पती विनायक यांनी बंडखोरी करत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे अर्चना यांनी आता भावाच्या घरी मुक्काम हलवल्याची माहिती आहे. माहेरी राहून भाजपचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी महापौर अर्चना डेहनकर म्हणाल्या, पतीला अपक्ष फॉर्म भरु नका, असे सांगितले. पण त्यांनी अर्ज केला. पक्षासोबत राहिले पाहिजे असे म्हणने होते. राजकीय वाद टाळण्यासाठी मी हा निर्णय घेतल्याचे डेहनकर यांनी सांगितले. अर्चना डेहनकर या भारतीय जनता पक्षाच्या एक ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या नागपूरच्या माजी महापौर (२००९-२०१२) होत्या. भाजपच्या महाराष्ट्र महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा होत्या. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या आणि त्यांचे पती विनायक डेहनकर यांच्या पक्षातील भूमिकेमुळे राजकीय चर्चा सुरू आहे. संभ्रम टाळण्यासाठी पाऊल पती-पत्नी वेगवेगळ्या राजकीय भूमिकेत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे भाजपच्या स्थानिक प्रचारात स्पष्टता येणार आहे. नेत्यांची मध्यस्थी अपयशी विनायक डेहनकर यांची बंडखोरी रोखण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले होते, मात्र त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब केल्याने अखेर अर्चना डेहनकर यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. २००९ मध्ये होत्या महापौर अर्चना डेहनकर १९९७ आणि २००७ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. २००९ मध्ये त्यांच्याकडे नागपूरच्या महापौर पदाचा कार्यभार सोपवण्यात आला. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र महिला मोर्चाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. त्या प्रवक्त्याही राहिल्या आहेत. पक्षादेशाला प्राधान्य अर्चना डेहनकर यांनी कौटुंबिक संबंधांपेक्षा पक्षनिष्ठेला महत्त्व देत पतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. भाजपची अधिकृत उमेदवारी नाकारणाऱ्या पतीच्या प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/PSiDlVk

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.