कल्याणमधील शिवसेना ठाकरे गटाचे ४ नगरसेवक गेल्या आठवड्याभरापासून मोबाइल बंद करून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या नगरसेवकांना सत्ताधाऱ्यांनी पळवून नेल्याचा संशय ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी व्यक्त केला असून याप्रकरणी त्यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत ठाकरे गटाचे ११ नगरसेवक विजयी झाले आहेत. महापालिकेचा निकाल लागल्यानंतर नगरसेवक ॲड. कीर्ती ढोणे आणि मधुर म्हात्रे यांनी आपले संपर्क क्रमांक बंद केले. त्यानंतर स्वप्नाली केणे आणि राहुल कोट हेदेखील पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कातून बाहेर झाले. या चारही नगरसेवकांनी पक्षाशी आणि मतदारांशी प्रतारणा केल्याची भावना आता शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे. हे नगरसेवक ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांच्या जीविताची आणि संरक्षणाची जबाबदारी पक्षाची आहे असेही पाटील यांनी सांगितले. या प्रकरणावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बेपत्ता नगरसेवकांचे ‘मिसिंग’ पोस्टर कल्याण-डोंबिवलीत लावणार असून ते भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यालयांवर चिकटवू, असा आक्रमक पवित्रा ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे. पक्षांतर केल्यास कारवाईचा बडगा आठवडा उलटूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आता कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे. या नगरसेवकांनी पक्षांतर करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची तयारीही ठाकरे गटाने केली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/jUTNayG
कल्याणमधील ठाकरे गटाचे चार नगरसेवक बेपत्ता; पोलिसांत तक्रार:नगरसेवकांना सत्ताधाऱ्यांनी पळवून नेल्याचा ठाकरे गटाचा संशय
January 24, 2026
0