Type Here to Get Search Results !

हिवरखेड न.प.मध्ये भाजपचा उमेदवार; सूचक काँग्रेस, अनुमोदक एमआयएम:भाजपने घेतला बालकल्याण उपसभापतीचा राजीनामा

अकोट नगर परिषदेतील अभद्र युतीवरून उठलेला राजकीय धुरळा बसत नाही तोच हिवरखेड नगर परिषदेत अभद्र राजकीय खिचडीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी निशाणा साधला आहे. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगर परिषद सभापती व उपसभापतिपदाच्या निवडी २० जानेवारीला झाल्या. यात बालकल्याण उपसभापतिपदासाठी भाजपकडून अनिता वाकोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून काँग्रेसच्या नगरसेविका रुबिना अब्दुल सलमान यांची स्वाक्षरी आहे तर अनुमोदक म्हणून एमआयएमचे नगरसेवक आजम खान सुभेदार खान हे आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे ३ पक्ष एकाच उमेदवारासाठी एकत्र आल्याने ‘छुप्या युती’ची चर्चा रंगली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी परखड टीका केली असून ‘हिवरखेडमध्ये महायुती की, महाखिचडी’ अशी पोस्ट केली. दरम्यान, अकोट प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस किंवा एमआयएमचा कोणत्याही प्रकारचा पाठिंबा घ्यायचा नाही, असे निर्देश स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले होते. नगरसेवकांना तांत्रिक बाबींची माहिती नव्हती हिवरखेड नगरपरिषदेत उपाध्यक्ष, उपसभापती व विषय समितीच्या निवडी अविरोध झाल्या. शासन निर्देशानुसार समित्यांमध्ये विरोधी पक्षातील सदस्यांचा समावेश बंधनकारक आहे. सर्व अर्जांवर सूचक व अनुमोदक लागतात. तसेच सूचक व अनुमोदक रिपीट करता येत नाहीत. कोणाचाही आक्षेप नसल्याने सदस्यांनी अर्जावर सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केल्या. आम्हाला तांत्रिक बाबींची माहिती नव्हती, असे काँग्रेसचे गजानन वानखडे यांनी सांगितले. कुणाशीही युती नाही निवडी बिनविरोध झाल्या. कुणाशीही युती नाही. भाजपच्या बालकल्याण उपसभापतिपदाच्या उमेदवार अनिता वाकोडे यांनी अर्जावर काँग्रेसच व एमआयएमच्या नगरसेवकांची सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षरी घेतली. भाजपने वाकोडे यांच्याकडून राजीनामा घेतला आहे. - गिरीश जोशी, प्रवक्ते, भाजप, अकोला हिवरखेड पालिकेतील पक्षीय बलाबल नगराध्यक्ष : सुलभा दुतोंडे (भाजप) भाजप ११ शिंदेसेना ०५ काँग्रेस ०२ वंचित ०१ एमआयएम ०१

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/G4nrcB2

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.