Type Here to Get Search Results !

मोफत आयुर्वेदिक उपचार मिळणार; 50 खाटांच्या आयुष रुग्णालयाचा मार्ग मोकळा:केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची घोषणा; केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

शहरातील आरोग्य सुविधेत आता आयुर्वेद उपचारांची मोलाची भर पडली आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांसाठी हक्काचे केंद्र सुरू झाले असून लवकरच सर्वसामान्यांसाठी ५० खाटांचे अद्ययावत आयुष रुग्णालय उभारले जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दिलेल्या जागेच्या प्रस्तावाला केंद्र सरकार लवकरच मंजुरी देणार असल्याची घोषणा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने रविवारी (८ फेब्रुवारी) जालना रोड परिसरात या नवीन आयुर्वेदिक वेलनेस सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी मंत्री जाधव म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमधील सीजीएचएस लाभार्थींची अनेक दिवसांची आयुर्वेदिक उपचारांची मागणी या युनिटमुळे पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारी कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि निवृत्तिवेतनधारकांना आता तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला आणि औषधे एकाच छताखाली मोफत उपलब्ध होतील. नागरिकांना या सुविधा मिळणार: ५० बेडचे आयुष रुग्णालय उभारण्यासाठी महानगरपालिकेने २४१० चौरस मीटर जागेचा प्रस्ताव दिला आहे. या रुग्णालयामुळे केवळ सरकारी कर्मचारीच नव्हे, तर सर्वसामान्यांनाही आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार पद्धतीचा लाभ घेता येणार आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी पूर्वी मंजूर झालेली काही केंद्रे केवळ जागेअभावी सुरू होऊ शकली नव्हती. मात्र, आता महानगरपालिका आणि राज्य सरकारने जागेचा प्रश्न सोडवल्यामुळे ही रखडलेली रुग्णालये तातडीने सुरू केली जाणार आहेत. या कार्यक्रमाला आमदार बाबुराव कोहळीकर, जीएसटी आयुक्त प्रदीप गुरुमूर्ती, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/txmpYd7

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.