कर्नाटकच्या भाविक महिलेचा घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेतल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. २१) रात्री घडली. मोरम्मा मलकाजप्पा पट्टन शेट्टी (५८, रा. हिरे मसली बुद्रुक, ता. इंडी, जि. विजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. मोरम्मा पट्टन शेट्टी या कुटुंबीयांसह २७ जणांच्या समूहात ११ फेब्रुवारीला कर्नाटकातून यात्रेसाठी निघाल्या होत्या. यात्रेत औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, काशी विश्वेश्वर, उज्जैनचे महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वेरूळचे घृष्णेश्वर अशी सहा ज्योतिर्लिंगे त्यांनी पाहिली होती. पुढील सहा ज्योतिर्लिंगांचे दर्शन नियोजित होते. शनिवारी रात्री सुमारे १० वाजता दर्शन घेऊन त्या मंदिर परिसरातील पार्किंगकडे परतल्या. त्याचवेळी त्यांना तीव्र झटका आला. सोबतच्या भाविकांनी त्यांना खुलताबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. रविवारी (दि. २२) सकाळी साडेअकरा वाजता शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाले. नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत महिलेचा मुलगा भारतीय सैन्यात कर्नल पदावर श्रीनगर येथे कार्यरत असल्याची माहिती आहे. सर्व भाविक कर्नाटकचे असल्याने त्यांना मराठी समजत नव्हती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब फुलारे यांनी पुढाकार घेत मदत केली. मृतदेह मूळ गावी पाठविण्यासाठीही मदत केली. घटनेची नोंद खुलताबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून झाली आहे. पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी ए. एफ. अव्हाड तपास करत आहेत. २६ जणांनी सोडली यात्रा या घटनेनंतर २७ भाविकांच्या समूहाने उर्वरित सहा ज्योतिर्लिंगांचे दर्शन न घेता यात्रा अर्धवट सोडली. सर्वांनी कर्नाटकातील मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. यात्रेवर शोककळा पसरली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/YfiO5a0
घृष्णेश्वर दर्शनानंतर महिला भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू:खुलताबाद ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद
February 22, 2026
0