नाथषष्ठीच्या पर्वाचे औचित्य साधत संत एकनाथ महाराज यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन, पैठण व नाथवंशज योगिराज महाराज पैठणकर यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार दिले जातात. यंदाचा प्रथम क्रमांकाचा भानुदास एकनाथ पुरस्कार २०२६ गोसेवक विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे. ताम्रपट, २५ हजार रुपये रोख, एकनाथ महाराजांची मूर्ती, एकनाथी भागवत, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. श्री एकनाथ संस्थानाधिपती वै. हभप श्री भय्यासाहेब महाराज पैठणकर वारकरी भूषण पुरस्कार बीड येथील नामवंत कीर्तनकार, एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेचे पाईक अमृताश्रम स्वामी महाराज (जोशी बाबा) यांना जाहीर झाला आहे. श्रीसंत एकनाथ महाराज प्रबोधमार्तंड पुरस्कार अहिल्यानगर येथील ज्येष्ठ कीर्तनकार प्रमोद महाराज जगताप यांना मिळणार आहे. श्री संत एकनाथ महाराज स्वरमार्तंड पुरस्कार अभिनवगंधर्व पं. रघुनाथ खंडाळकर यांना जाहीर झाला आहे. श्रीसंत एकनाथ महाराज तालमार्तंड पुरस्कार तबलावादक पांडुरंग पवार यांना मिळणार आहे. श्रीसंत एकनाथ महाराज वारकरी सेवा पुरस्कार पुणे येथील गोसेवक संजयबापू बालवडकर यांना समारंभपूर्वक दिला जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा श्रीसंत नरहरी सोनार धर्मशाळा, नाथगल्ली, पैठण येथे मंगळवारी (१० मार्च) सकाळी ९ वाजता होणार आहे. कार्यक्रमानंतर भोजन प्रसादाची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सोहळ्यास वारकरी उपस्थित राहणार आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/hNQdMWx
नाथषष्ठीनिमित्त एकनाथ महाराज पुरस्कार जाहीर:वितरण 10 रोजी, पुरस्कारार्थींमध्ये पाचपोर महाराज, अमृताश्रम स्वामी आदींचा समावेश
March 05, 2026
0