Type Here to Get Search Results !

अभाविपच्या विद्यार्थ्यांनी सिनेट सभेचा ताबा घेतला:42 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, प्रशासन विद्यार्थी प्रश्नांवर निरुत्तर

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सभेत बुधवारी, ११ मार्च रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) पदाधिकाऱ्यांनी थेट सभागृहात प्रवेश करत कामकाज थांबवले. विद्यार्थी हिताच्या प्रश्नांवर प्रशासनाच्या कथित अपयशाविरोधात त्यांनी ठिय्या आंदोलन केले. विद्यापीठाच्या 'प्रवेश, परीक्षा आणि निकाल' या तिन्ही आघाड्यांवर प्रशासन अयशस्वी ठरल्याचा आरोप अभाविपने केला. विद्यापीठाच्या ४२ वर्षांच्या इतिहासात असा प्रसंग पहिल्यांदाच घडला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सुमारे पाऊण तास सभागृहात घोषणाबाजी करत ठिय्या मांडला. 'नुटा' समर्थित सदस्य प्रा. कैलास चव्हाण आणि भय्यासाहेब मेटकर यांनी अभाविपची घोषणाबाजी थांबवण्याची मागणी केली. अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री पायल किन्नाके आणि विभाग संघटन मंत्री योगेश शेळके यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. काही महिन्यांपूर्वी केलेल्या मागण्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा त्यांचा आरोप होता. पीठासीन सभापती कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे आणि कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी सर्व सिनेटरसमोर भूमिका स्पष्ट करावी, अशी त्यांची मागणी होती. कुलगुरूंनी त्यांच्या दालनात चर्चेची तयारी दर्शवली, मात्र अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी सभागृहातच चर्चा करण्याचा आग्रह धरला. अखेर कुलगुरूंना नमते घ्यावे लागले. त्यानंतर अभाविपने मागणीनिहाय मुद्दे मांडले, परंतु विद्यापीठ प्रशासन ठोस उत्तरे देऊ शकले नाही. या चर्चेत कुलगुरू, कुलसचिव यांच्यासह परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, माजी संचालक डॉ. हेमंत देशमुख आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर सहभागी होते. अखेर पाऊण तासाच्या चर्चा-प्रतिचर्चेनंतरही आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. भविष्यात याहून तीव्र आंदोलनाचा इशारा देत अभाविपने सभागृह सोडले. अभाविपचे आंदोलन संपल्यानंतर युवक काँग्रेसचे वैभव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एनएसयुआय आणि एआयएसएफच्या पदाधिकाऱ्यांनीही सिनेट सभागृहात येऊन आंदोलनकर्त्यांवर कारवाईची मागणी केली. विद्यार्थी हितासाठी आंदोलन करणे गैर नाही, परंतु अभाविपच्या आजच्या आंदोलनाने विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाल्याचे त्यांचे म्हणणे होते.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/S0M3Pij

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.