Type Here to Get Search Results !

छत्रपती संभाजीनगरकरांना युद्धाच्या झळा:कर्मशियल गॅसचे सिलिंडर ब्लॅकमध्ये 3200 वर, पुरवठा निम्म्यावर, केटरर्सकडून नवीन ऑर्डर बंद, ग्राउंड रिपोर्ट

अमेरिका, इस्त्रायल विरुद्ध इराण युद्धाचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागलेत. या युद्धाचा मोठा फटका थेट छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल व्यावसायिक, छोटे उद्योजक आणि रिक्षाचालकांना बसतोय. त्यामुळे शहराचे अर्थचक्र संकटात सापडले आहे. घरगुती गॅस ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने नाशिक येथील गॅस डेपोतून दररोज सुमारे 150 टन एलपीजीचा पुरवठा सुरू ठेवला आहे. रुग्णालय आणि शाळांचा गॅस पुरवठा खंडित होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाच्या या आश्वासनानंतरही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, गॅस एजन्सीवर घरगुती ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळतेय. कर्मशियल गॅसचा पुरवठा जवळपास होत नसल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरमधील या परिस्थितीचा दिव्य मराठी डिजिटलने ग्राउंड रिपोर्टमधून घेतलेला हा आढावा. व्यावसायिक हतबल गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धाचा सर्वाधिक फटका छोट्या हॉटेल उद्योजकांना बसला आहे. 1600 रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 3200 रुपयांना 'ब्लॅक'ने घ्यावा लागत आहे, असे नाव न छापन्याच्या अटीवर एका व्यावसायिकाने सांगितले. तर अव्वाच्या सव्वा पैसे देऊनही गॅस मिळत नाहीये आणि गॅस महागला असला तरी हॉटेलच्या मेन्यूचे दर वाढवता येत नसल्याने व्यावसायिक हतबल झालेत. "दोन दिवसात गॅस संपला तर हॉटेल बंद करण्याशिवाय पर्याय नाही, अशी खंत उद्योजकांनी व्यक्त केली. पैसे भरून गॅस नाही मेसचालकांसमोर बाहेरगावच्या मुलांच्या जेवणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. गॅसअभावी मेस बंद झाल्यास ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या तरुणांना गावी परत जावे लागेल किंवा त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती व्यक्त होत आहे. एका ग्राहकाने तक्रार केली की, एक आठवड्यापूर्वी ऑनलाइन पैसे भरूनही गॅस मिळालेला नाही. एजन्सीचे फोन लागत नाहीत. एका महिलेने सांगितले की, गेल्या 3 दिवसांपासून बुकिंगसाठी संपर्क होत नाही. गॅसची गाडीही वस्तीत येत नाही. घरात साठा नसल्याने आता स्वयंपाक कसा करायचा, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. पुरवठा साखळी खंडित अनेक गॅस एजन्सीवर अफवांमुळे लोक गॅससाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे एजन्सीचालक आणि ग्राहकांमध्ये कडाक्याची भांडणे होत आहेत. दुसरीकडे सध्या कर्मशियल गॅसचा पुरवठा जवळपास ठप्प असल्याचे समजते. तर घरगुती गॅस सिलिंडरचे रोज चार ते दोन टँकर हमखास यायचे. मात्र, हा पुरवठा सुद्धा आता निम्म्यावर आल्याचे गॅस एजन्सीचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ऑनलाइन फूड डिलिव्हरीला फटका ज्यांच्याकडे गॅस साठवण्यासाठी जागा नाही, अशा छोट्या उद्योजकांचा रोजगार धोक्यात आला आहे. या टंचाईमुळे अनेकांनी आता कोळसा, लाकूड किंवा इंडक्शन शेगड्यांचा वापर सुरू केला असून, काही ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करण्याची तयारी केली जात आहे. याचा परिणाम ऑनलाइन फूड डिलिव्हरी व्यवसायावरही होण्याची शक्यता आहे. रिक्षा जागेवर थांबले व्यावसायिक गॅस साठ्यावर आलेल्या मर्यादांमुळे केवळ हॉटेलच नव्हे, तर एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षाचालकांनाही मोठा फटका बसला आहे. इंधनाअभावी रिक्षा थांबल्याने रोजच्या कमाईवर परिणाम झाला आहे. आखातातील युद्धाच्या ठिणगीने छत्रपती संभाजीनगरमधील सामान्य माणसाची चूल आणि व्यवसाय दोन्ही धोक्यात आणले आहेत. सरकारने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. नवीन ऑर्डर बंद काही गॅस एजन्सी चालकांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे केटरर्सनी नवीन ऑर्डर घेणे बंद केले आहे. दुसरीकडे, घरगुती गॅसचा साठा पुरेसा असल्याचे सांगितले जात असले तरी 'बुकिंग सायकल' 30 दिवसांची करण्यात आल्याने ग्राहकांमध्ये गोंधळ आहे. घरगुती गॅस उपलब्ध रेणुका गॅस एजन्सीचे मालक अजय नरवडे यांनी सांगितले की, 'चुकीच्या माहितीमुळे लोक गर्दी करत आहेत, घरगुती सिलिंडरची टंचाई भासणार नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. घरघुती गॅसची काहीही समस्या नाही, काही चुकीच्या माहितीमुळे लोकांची गॅस एजन्सीबाहेर गर्दी करत गॅसच मागणी करत आहेत. घरगुती वापराच्या सिलिंडरसाठी नागरिकांना काहीही समस्या येणार नाही. सूचनेनुसार काम करू अजय नरवडे पुढे म्हणाले की, 'सरकारकडून व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी काही सूचना आलेल्या नाहीत. सरकारच्या ज्या सूचना येतील त्यानुसार आम्ही काम करू. कंपनीकडे पुरेसा साठा आहे. सरकारने सुद्धा घरगुती वापराच्या सिलिंडरसाठी काहीही समस्या येणार नाहीत. लोकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही.' सरकारकडून खंडन राज्यात घरगुती एलपीजी (LPG), व्यावसायिक गॅस आणि सीएनजीचा (CNG) तुटवडा निर्माण झाला असून, सिलिंडरसाठी ग्राहकांना आता अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने या अफवांचे खंडन करत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. प्राधान्यक्रमात बदल राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) दिलेल्या माहितीनुसार, 'व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. केंद्र सरकारने सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीचा विचार करून सर्व राज्यांना 'घरगुती एलपीजी' पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यासंदर्भातील प्राधान्यक्रमात तात्पुरता बदल होऊ शकतो. मात्र, व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.' परिस्थिती कधीपर्यंत सुधारेल? इंडियन ऑइलचे मुख्य महाव्यवस्थापक (एलपीजी) के.एम. ठाकूर यांचे म्हणणे आहे की, ग्राहकांनी घाबरण्याची गरज नाही आणि पॅनिक बुकिंग करू नये. सरकार आता अमेरिकेसारख्या देशांकडून पर्यायी कार्गो मागवण्याचा विचार करत आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर G7 देश त्यांच्या आपत्कालीन तेल साठ्यातून पुरवठा सुरू करण्यावर चर्चा करत आहेत, जेणेकरून जागतिक बाजारातील ऊर्जा संकट कमी करता येईल. रशिया आणि अल्जेरियाकडूनही अतिरिक्त कच्च्या तेलाची आवक होण्याची अपेक्षा आहे. संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने 5 आवश्यक पावले उचलली 1. उच्चस्तरीय समिती स्थापन केली: संकट लक्षात घेता, पेट्रोलियम मंत्रालयाने तीन तेल कंपन्यांच्या कार्यकारी संचालकांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, जी पुरवठ्याचा आढावा घेईल. 2. अत्यावश्यक वस्तू कायदा लागू: गॅसचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 'अत्यावश्यक वस्तू कायदा 1955' लागू केला आहे. 3. 25 दिवसांनंतर एलपीजी बुकिंग होईल: घरगुती सिलिंडरच्या बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ग्राहकाला एक सिलिंडर मिळाल्यानंतर दुसरा सिलिंडर 25 दिवसांनंतरच बुक करता येईल. 4. OTP आणि बायोमेट्रिक अनिवार्य: गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी डिलिव्हरी एजंट OTP किंवा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनचा कठोरपणे वापर करत आहेत. 5. LPG उत्पादन वाढवण्याचे आदेश: सरकारने सर्व ऑइल रिफायनरीजना LPG उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले होते. सूत्रांनुसार, आता उत्पादन 10% नी वाढले आहे. थोडे गॅस पुराण - 'सीएमआय' अध्यक्ष उत्सव माछर म्हणतात, 2800 उद्योग आणि 920 हॉटेल संकटात. - बहुतांश कारखान्यांकडे तीन ते पाच दिवस पुरेल इतकाच गॅससाठा उपलब्ध आहे. - ऑटोमोबाइल स्टील, अभियांत्रिकी, फार्मा आणि फूड प्रोसेसिंग उद्योगांवर संकट. - लिक्विड नॅचरल गॅस अर्थातच 'एलएनजी' हा उद्योग आणि वीज प्रकल्पांसाठी वापरतात. - घरगुती, हॉटेल, व्यावसायिक आस्थापने पाइप्ड नॅचरल गॅस म्हणजेच 'पीएनजी' वापरतात. - वाहनांसाठी इंधन म्हणून काँप्रेस्ड नॅचरल गॅस अर्थातच 'सीएनजी'चा वापर केला जातो. - उद्योगासाठी 'एलएनजी' काही प्रमाणात देशात 'ओएनजीसी' आणि 'रिलायन्स' करते. - 'एलएनजी'ची आयात ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कतार, रशिया, आफ्रिकी देशातून होते. - 'एलएनजी' द्रवरूपात आणला जातो. त्याचे पुन्हा वायूरूपात रूपांत करून पुरवठा होता. - गेल (इंडिया) लिमिटेड आणि इतर पुरवठादारांकडून गॅसची देशभरात वाहतूक होते. - उद्योग, व्यावसायिक आस्थापने, घरामध्ये सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन कंपन्या गॅस पुरवतात.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/oAaCKsl

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.