अमरावती येथील सायन्सकोर मैदानावर जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत (डीआरडीए) आयोजित 'मिनी सरस' प्रदर्शनात पाच दिवसांत १ कोटी ३ लाख ८६ हजार ४३२ रुपयांची विक्रमी उलाढाल झाली आहे. ही आतापर्यंतच्या आयोजनातील सर्वोच्च कामगिरी ठरली आहे, असे जिल्हा परिषद प्रशासनाने म्हटले आहे. या उलाढालीमध्ये ५० लाख ४० हजार ९२२ रुपयांच्या वस्तू व घरगुती उत्पादनांची विक्री झाली, तर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या खानावळींनी तब्बल ५३ लाख ४५ हजार ५१० रुपयांच्या खाद्यपदार्थांची विक्री केली. या प्रदर्शनात सामीष-निरामिष खाद्यसंस्कृतीचे १७८ स्टॉल्स आणि वस्तू विक्रीचे ५८ स्टॉल्स लावण्यात आले होते. डीआरडीएतर्फे दरवर्षी अशाप्रकारचे आयोजन केले जाते. यावर्षी ४ ते ८ मार्च या कालावधीत हे प्रदर्शन पार पडले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. शहरात इतरही काही लहान-मोठे आयोजन असतानाही नागरिकांनी 'मिनी सरस'ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे प्रथमच एक कोटीहून अधिक रकमेची उलाढाल झाली. या 'मिनी सरस'मध्ये एकूण २३६ महिला बचतगटांचे स्टॉल्स होते. यामध्ये जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) स्थापन झालेल्या १६५, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) ५५ आणि कोकण, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांमधून विशेष निमंत्रित केलेल्या १६ महिला बचतगटांचा समावेश होता. या बचतगटांनी कुरळ्या, शेवया, पापड, लोणची, डाळी, हळद, मिरची पावडर, मुखशुद्धीचे पदार्थ तसेच कपडे, खेळणी आणि घर सजावटीच्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र आणि डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांनी या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. या उपक्रमात दररोज दुपारी वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन आणि उद्बोधनाचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महिला बचतगटांना बळकटी देणाऱ्या विषयांची निवड करण्यात आली होती. महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी महिलांचे विशेष कार्यक्रम घेण्यात आले. तसेच, हास्य जत्रेच्या कलावंतांनी हजेरी लावली आणि बचतगटांच्या महिलांनी नृत्य व नाट्याचे सादरीकरण केले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/TOjfeYh
मिनी सरसमध्ये 5 दिवसांत 1.03 कोटींची विक्रमी उलाढाल:अमरावतीत महिला बचतगटांच्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
March 09, 2026
0