Type Here to Get Search Results !

अमरावतीत धुलीवंदनादिवशी दोन तरुणांचा बुडून मृत्यू:मातोश्री वृद्धाश्रमाजवळील तलावात घडली घटना; एका चिकन विक्रेत्यावर हल्ला

अमरावती येथे धुलीवंदनाच्या दिवशी दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला. अनुज नितीन खडेकार (१९) आणि कार्तिक प्रदीप राऊत (१९) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे. याच दिवशी फ्रेजरपुरा भागात एका चिकन विक्रेत्यावर खुनी हल्ला झाल्याची दुसरी घटनाही घडली. भानखेड रस्त्यावरील मातोश्री वृद्धाश्रमामागे असलेल्या तलावात ही घटना घडली. अनुज आणि कार्तिक हे दोघेही पदवीचे शिक्षण घेत होते. धुलीवंदनानिमित्त सहा मित्र तलावाकाठी फिरण्यासाठी गेले होते. दुपारी ४ च्या सुमारास एका मित्राने फोन करून कार्तिक आणि अनुजला तिथे बोलावले. ते दोघे पोहोचल्यानंतर आठपैकी इतर दोन मित्र तेथून निघून गेले. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास उर्वरित सहा जणांनी पोहण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अनुज आणि कार्तिक यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने अन्य एका मित्राने पाण्यात उडी घेतली. तोही गटांगळ्या खाऊ लागला, परंतु काठावर उभ्या असलेल्या इतर तिघांनी त्याला धीर देत किनाऱ्यावर येण्यास सांगितले. त्यानंतर चौघा मित्रांनी ११२ क्रमांक डायल करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दलाला कळवले. अर्ध्या-पाऊण तासाच्या अंतराने बडनेरा पोलिस उपनिरीक्षक सचिन माकोडे आणि मनपा अग्निशमन दलाचे प्रमुख प्रेमानंद सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथके घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि मुदलीयार नगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. उपस्थित मित्रांच्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने आणि तोपर्यंत अंधार झाल्याने शोधकार्यात अडचणी आल्या. त्यानंतर जिल्हा शोध व बचाव पथकाला (DDRF) पाचारण करण्यात आले. DDRF ची चमू रात्री नऊच्या सुमारास पोहोचली. त्यांच्या पट्टीच्या पोहणाऱ्यांनी गळ व हूक टाकून रात्री १०.३० च्या सुमारास अनुजचा आणि त्यानंतर कार्तिकचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांना ही बातमी कळवण्यात आली. दोन्ही मृतदेह तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/asmHwxP

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.